
सोलापूर प्रतिनिधी
अक्कलकोट | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोटमध्ये काळं फेकण्याची खळबळजनक घटना घडली. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या गायकवाड यांना, शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून, महाराष्ट्रभर विविध दौऱ्यावर असतात. आज अक्कलकोट येथे आयोजित सत्कार समारंभात ते सहभागी होण्यासाठी आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचताच शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते अचानकपणे जमले आणि त्यांनी गायकवाड यांना काळं फासलं. यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता, तसेच स्वामी समर्थ यांच्याविषयीही अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनेने यापूर्वीही संभाजी ब्रिगेडविरोधात उपोषण केलं होतं.
घटनेनंतर गायकवाड यांनी तत्काळ कारमध्ये आसरा घेतला, मात्र कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी कारमध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. कारबाहेरही त्यांना धक्काबुक्की झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात प्रवीण गायकवाड यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेनंतर अक्कलकोटमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या प्रकारामुळे प्रवीण गायकवाड यांच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात यामुळे नव्या वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.