मुंबई प्रतिनिधी
जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीने अखेर भारतात आपलं दमदार पदार्पण केलं आहे. मंगळवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलं.
विशेष म्हणजे, शोरूमवर लावलेली पाटी ‘जय महाराष्ट्र’च्या गजरात मराठीत झळकत होती. टेस्लाने आपल्या पहिल्याच भारतीय शोरूममध्ये स्थानिक संस्कृतीला मान देत मराठी भाषेला प्राधान्य दिलं असून महाराष्ट्र सरकारच्या सर्व नियमांचं पालन केल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोणती गाडी किती दमदार?
टेस्लाच्या या शोरूममध्ये लोकप्रिय मॉडेल Y आणि मॉडेल 3 सादर करण्यात आल्या आहेत.
मॉडेल Y – ही टेस्लाची पहिली भारतात विक्रीसाठी दाखल होणारी कार असेल. चीनमधून आयात करण्यात आलेल्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये Long Range RWD आणि Long Range AWD (Dual Motor) हे दोन पर्याय असतील.
– पूर्ण चार्जनंतर 574 किमीपर्यंतची दमदार रेंज
– फक्त 4.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग
मॉडेल 3 – या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिची वेगवान कामगिरी.
– फक्त 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग
– अमेरिका किंमत : $29,990 (सुमारे ₹25.99 लाख)
– भारतात संभाव्य किंमत : ₹29.79 लाख (आयात शुल्कानंतर किंमत वाढण्याची शक्यता)
‘शोरूम’चं भाडंही ठरलं चर्चेचा विषय!
BKCच्या आलिशान परिसरात 4,000 चौरस फूट जागा टेस्लाने पाच वर्षांसाठी लीजवर घेतली आहे.
– मासिक भाडं: ₹35.26 लाख
– दरवर्षी 5% भाडेवाढ
– पाच वर्षांनंतर संभाव्य भाडं: ₹43 लाख प्रति महिना
भारतीय मार्केटमध्ये टेस्लाची एंट्री ‘गेमचेंजर’?
टेस्लाच्या आगमनामुळे भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रात तंत्रज्ञान आणि स्टाइलच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. सध्या जरी गाड्यांची आयात केली जात असली तरी भविष्यात भारतात स्थानिक उत्पादन सुरू करण्याचा विचार कंपनी करत असल्याचं संकेत मिळाले आहेत.


