
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती २०२५ ला मोठा प्रतिसाद मिळाला असून गट-क आणि गट-ड मधील ३० संवर्गातील एकूण ६६८ पदांसाठी तब्बल ८४,७७४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी १६ ते १९ जुलै दरम्यान ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा होणार आहे.
उमेदवारांची संख्या लक्षात घेता राज्यभरात १२ जिल्ह्यांमधील २८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्वाधिक अर्ज मुंबई (२२,०६०) व पुणे (२१,६८३) जिल्ह्यातून आले असून, छत्रपती संभाजीनगर (११,९६४), अमरावती (७,२१४) व नागपूर (६,५४७) याही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सहभाग नोंदवला आहे.
विलक्षण नियोजन, कडक व्यवस्था
उमेदवारांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता यावी, यासाठी नवी मुंबई महापालिकेने काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महापालिकेचे वर्ग १ श्रेणीचे अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर २ ते ३ अधिकारी निरीक्षक म्हणून कार्यरत असणार आहेत.
ही ऑनलाईन परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. परीक्षेस पात्र उमेदवारांना प्रवेशपत्रे परीक्षेच्या सात दिवस आधीच देण्यात आली असून, आत्तापर्यंत ७५,००० पेक्षा अधिक उमेदवारांनी ती डाउनलोड केली आहेत. उर्वरित उमेदवारांना एसएमएस व ई-मेल द्वारे स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.
भूलथापांना बळी पडू नका – प्रशासनाचा इशारा
ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व नियोजित पद्धतीने पार पडणार असून कोणत्याही अफवा, दलाल किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असा स्पष्ट इशारा उपायुक्त शरद पवार यांनी दिला आहे.
परीक्षेचं संवर्गनिहाय वेळापत्रक व इतर सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.nmmc.gov.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हावार उमेदवारांची संख्या (संक्षिप्त रूपात):
मुंबई: २२,०६०
पुणे: २१,६८३
छत्रपती संभाजीनगर: ११,९६४
अमरावती: ७,२१४
नागपूर: ६,५४७
नांदेड: ५,६४०
कोल्हापूर: ४,९११
ठाणे: २,०२५
नाशिक: १,९०८
सातारा: ६२१
रायगड: २०१
विशेष सूचना:
महापालिकेच्या भरतीबाबत अधिकृत माहिती केवळ www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरच तपासावी. कोणत्याही अनधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवू नये.