
मुंबई प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळं फासल्याप्रकरणी भाजपशी संबंधित दीपक काटे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आमनेसामने आले आहेत.
एका बाजूला बावनकुळे यांनी “दीपक काटे यांचा भाजपशी काहीही संबंध नाही” असा निर्वाळा दिला असताना, दुसरीकडे अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओच्या आधारे बावनकुळेंचाच मुख्यमंत्र्यांसमवेत काटेंना पाठिंबा देतानाचा संवाद समोर आणला आहे. या व्हिडीओमुळे भाजपची कोंडी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
व्हिडीओमधील संभाषणाने उडाली खळबळ
सामाजिक माध्यमावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बावनकुळे म्हणताना दिसत आहेत की, “दीपक, एक कार्यकर्ता आहे. त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवले. मागच्या सरकारच्या काळात अन्याय झाला. मी तेव्हा तुला सांगितलं होतं, चिंता करू नकोस. देवेंद्रजी आणि मी तुझ्या सोबत आहोत.”
कालपर्यंत तुम्ही काटे ला ओळखत नव्हता ना? प्रदेशाध्यक्ष म्हणून पद आणि जबाबदारीचे वितरण करणे हे तुमचे काम म्हणजे दीपक काटे या सराईत गुन्हेगाराला भाजूयूमोचे प्रदेश सरचिटणीस पद तुम्ही दिले.
गुन्हेगाराच्या पाठीशी आहोत याचा कबुली जबाब देता…!! इतका कोडगेपणा येतो कुठून ?@cbawankule pic.twitter.com/y6Po5prC83— SushmaTai Andhare (@andharesushama) July 15, 2025
याच व्हिडीओवरून अंधारे यांनी आरोप लावला आहे की, हेच दीपक म्हणजे दीपक काटे असून, ते भाजपशीच संबंधित आहेत. अंधारेंच्या मते, बावनकुळे यांचा हा कबुलीजबाब काटेंना थेट पाठिंबा दर्शवणारा आहे.
अंधारेंचा सवाल – “इतका कोडगेपणा येतो कुठून?”
या व्हिडीओसोबत अंधारे यांनी बावनकुळेंना थेट टॅग करत टीका करत म्हटलं, “कालपर्यंत तुम्ही म्हणत होतात की काटे भाजपचा नाही. मग भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीसपद या सराईत गुन्हेगाराला कुणी दिलं? गुन्हेगाराच्या पाठीशी उभं राहत आहात आणि म्हणताय ‘चिंता करू नकोस’… हे भाजपचं दुहेरी तोंड दाखवणारं उदाहरण आहे.”
मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, विरोधकांचा आरोप
दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेतही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन सभागृहात दिलं. तरीही विरोधी पक्षाकडून भाजपवर तीव्र आरोप सुरूच असून, “सत्ताधाऱ्यांचा गुन्हेगारांना वरदहस्त आहे,” असा आरोप अनेक नेत्यांनी केला आहे.
राजकीय रणधुमाळी आणखी तीव्र होणार?
दीपक काटे प्रकरणाचा भाजपशी नेमका काय संबंध आहे? बावनकुळेंच्या विधानांमुळे आणि अंधारेंनी सादर केलेल्या व्हिडीओमुळे या वादाला अधिक उधाण आले आहे. येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगणार, हे निश्चित.