
मुंबई प्रतिनिधी
देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीची इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी अखेर मुंबईच्या समुद्रात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून ही अत्याधुनिक बोट गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीटी या दोन जलमार्गांवर नियमितपणे धावणार आहे.
या नव्या उपक्रमामुळे एकीकडे मुंबईतील वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग मिळणार आहे, तर दुसरीकडे प्रदूषणाच्या समस्येवरही नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात ही सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्वदेशी बनावटीचा अभिमान
ही ई-वॉटर टॅक्सी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांनी संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहे. देशात निर्मित झालेली पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी हीच असून, एमडीएलने सध्या ६ बोटींचं उत्पादन पूर्ण केलं आहे. त्यातील पहिली बोट इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली असून, ती सध्या अंतिम तांत्रिक चाचण्यांच्या टप्प्यात आहे.
वाहनचालकांसाठी नवी श्वासजंत्री
पूर्वी सुरू करण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वॉटर टॅक्सी सेवा अत्यंत खर्चीक ठरल्यामुळे अल्पावधीतच बंद करण्यात आल्या होत्या. मात्र बॅटरीवर चालणाऱ्या नव्या ई-बोटीमुळे ऑपरेटिंग खर्चात मोठी बचत होणार असून, प्रवासही शांत, स्वस्त आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे.
वाढत्या मागणीला ओळखून विस्ताराची योजना
सुरुवातीला मर्यादित मार्गांवर ही सेवा सुरू होत असली तरी लवकरच ती बेलापूर, खारापुरी, मांडवा यांसारख्या किनारी शहरांपर्यंत टप्प्याटप्प्याने विस्तारली जाणार आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो नागरिकांसाठी जलमार्ग प्रवासाची सोपी आणि वेगवान सुविधा उपलब्ध होणार आहे.
ई-वॉटर टॅक्सीची खास वैशिष्ट्ये
* लांबी: १३.२७ मीटर
* रुंदी: ३.०५ मीटर
* प्रवासी क्षमता: २४ प्रवासी
* वेग: १४ नॉटिकल माईल्स
* बॅटरी क्षमता: ६४ किलोवॅट (सुमारे ४ तास ऑपरेशन)
* सुविधा: वातानुकूलित, आधुनिक रचना, प्रदूषणमुक्त व शांत प्रवासाचा अनुभव
* चार्जिंग स्टेशनही सज्जतेच्या मार्गावर
ई-वॉटर टॅक्सीच्या नियमित सेवेसाठी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस आणि जेएनपीटी जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून, जेएनपीटीमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉईंटचं काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे देशांतर्गत पातळीवर इलेक्ट्रिक वॉटर ट्रान्सपोर्ट साखळी तयार होणार आहे.
“१ ऑगस्टपासून सेवा सुरू होत असून, जेएनपीटीमध्ये चार्जिंग स्टेशनच्या उभारणीस सुरुवात होणार आहे.”
— सोहेल कझानी, संचालक, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस
मुंबईसारख्या वाहतूकप्रधान शहरासाठी ई-वॉटर टॅक्सी ही वाहतूक, पर्यावरण आणि तंत्रज्ञान यांचा त्रिवेणी संगम ठरणार आहे. स्वदेशी बनावटीचा हा अभिनव प्रयोग देशातील इतर तटीय शहरांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.