
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या महसूल विभागातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) पदोन्नती मिळाली असून, केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत एक नवा अध्याय सुरु झाला आहे.
मनपूर्वक अभिनंदन!!
महाराष्ट्रातील बारा अधिकारी झाले आयएएस
महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने अधिसूचना जारी केली.
महाराष्ट्र महसूल सेवेतील बारा अधिकारी… pic.twitter.com/IMaM4XF3aj
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 14, 2025
UPSC कडून मंजुरी – महाराष्ट्र प्रशासनात नवसंजीवनी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शिफारस केलेल्या 12 अधिकाऱ्यांना IAS कॅडर प्रदान करण्यात आला आहे. महसूल विभागातील अधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवेत असलेल्या या अधिकाऱ्यांना अखेर देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
बावनकुळे: “प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल”
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ही पदोन्नती मोलाची ठरणार आहे. महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या जबाबदाऱ्यांतून राज्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली या अधिकाऱ्यांना मिळालेली संधी म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची पावती आहे.”
IAS दर्जा प्राप्त अधिकाऱ्यांची यादी:
* विजयसिंह देशमुख
* विजय भाकरे
* त्रिगुण कुलकर्णी
* गजानन पाटील
* महेश पाटील
* पंकज देवरे
* मंजिरी मनोलकर
* आशा पठाण
* राजलक्ष्मी शहा
* सोनाली मुळे
* गजेंद्र बावणे
* प्रतिभा इंगळे
पदस्थापना 2024 या वर्षातच
या अधिकाऱ्यांची IAS पदोन्नती 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त असलेल्या जागांवर लागू होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत राज्य प्रशासनात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.
बावनकुळेंचा विश्वास – “महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे बळ”
ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “मी नेहमीच महसूल सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन करत आलो आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी होईल, अशी खात्री आहे. ही पदोन्नती म्हणजे केवळ अधिकाऱ्यांची नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी पायरी आहे.”
संपूर्ण राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव
या पदोन्नतीनंतर महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशासन, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे. राज्याच्या प्रशासनात सक्षम नेतृत्व आणि पारदर्शक कारभारासाठी ही नियुक्ती उपयुक्त ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.