
मुंबई प्रतिनिधी
डिजिटल युगात आता आपल्या खिशात केवळ मोबाईल नव्हे तर सर्व सरकारी सेवा देखील पोहोचल्या आहेत. सरकारी कागदपत्रे घेऊन कार्यालयात जाण्याची गरज नाही, कारण ‘मेरा राशन 2.0’ अॅपने रेशन कार्डसुद्धा तुमच्या मोबाइलमध्ये आणलं आहे! केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या पुढाकारामुळे आता रेशन कार्ड संबंधित सर्व सेवा एका क्लिकवर मिळणार आहेत.
मोबाईल अॅपमुळे रेशन कार्ड जवळ ठेवण्याची गरज नाही
पूर्वी रेशन कार्ड संबंधित कामांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागत होते. मात्र आता ‘मेरा राशन 2.0’ अॅपमुळे रेशन घेणे, माहिती अपडेट करणे, व्यवहार तपासणे अशी कामे घरबसल्या होणार आहेत.
देशात कुठेही मिळवा रेशन
देशात कुठेही राहा, आता तुमचं रेशन कार्ड तिथेच उपयोगात येणार. आधार कार्ड आणि बायोमेट्रिक डेटाच्या आधारे रियल टाइम माहिती अॅपमध्ये अपडेट केली जाते. त्यामुळे स्थलांतरित कामगारांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे.
पारदर्शक व्यवहारांची नोंद
आता रेशन वाटपात पारदर्शकता येणार. अॅपवर प्रत्येक ट्रांजेक्शनची माहिती उपलब्ध राहणार आहे. रेशन कुठून, किती आणि केव्हा मिळालं याचा संपूर्ण हिशोब मोबाईलवर पाहता येणार आहे. आधार क्रमांक किंवा रेशन नंबर टाकून सहज लॉगिन करता येणार आहे.
तुमचंच रेशन कार्ड, तुमच्या हातात सुधारणा
तुमचं रेशन कार्ड अपडेट करणं आता इतकं सोपं झालंय की ते तुम्ही स्वत: करू शकता. नवीन सदस्य जोडणे, मोबाईल क्रमांक बदलणे, पत्ता अपडेट करणे ही सर्व कामं अॅपमधून सहज करता येतात.
जवळचं रेशन दुकान शोधा
तुम्ही नव्या शहरात असाल आणि रेशन दुकान कुठे आहे याची माहिती नसेल, तरही काळजी नको. अॅपमध्ये तुम्हाला जवळच्या सर्व सरकारी रेशन दुकानांची यादी मिळेल.
महत्त्वाची माहिती वेळेवर मिळणार
‘मेरा राशन 2.0’ अॅपची आणखी एक खासियत म्हणजे वेळोवेळी येणारी नोटिफिकेशन्स. रेशनबाबत कोणतीही नवी तारीख, योजना किंवा सुविधा सुरू झाल्यास त्याची माहिती अॅपद्वारे मिळणार आहे.
तुमच्या फोनमध्ये सरकारी सुविधा
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी सेवा अधिक सोप्या आणि नागरिकाभिमुख केल्या जात आहेत. ‘मेरा राशन 2.0’ हे त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. आता रेशन कार्डसाठी रांगा, अर्ज, आणि फेऱ्या या सगळ्यांवर पूर्णविराम मिळेल.