
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या आणि देशाच्या इतिहासात अभिमानाची भर टाकणारी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत यासंदर्भात निवेदन करत ही माहिती दिली. “हे यश महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवाची गोष्ट आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार. सात प्रस्ताव पाठवण्यात आले होते, त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा प्रस्ताव मंजूर झाला, ही अभिमानास्पद बाब आहे,” असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूतील १ किल्ला – जिंजी यांचा ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. ११ जुलै २०२५ रोजी पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या सत्रात या प्रस्तावास २० देशांच्या प्रतिनिधींनी एकमुखी मान्यता दिली.
युनेस्को यादीत समाविष्ट झालेल्या १२ किल्ल्यांची यादी:
* रायगड
* राजगड
* प्रतापगड
* शिवनेरी
* विजयदुर्ग
* सुवर्णदुर्ग
* सिंधुदुर्ग
* खांदेरी
* जिंजी (तमिळनाडू)
* तोरणा
* साळ्हेर
* अनईमलई किल्ला
“शिवाजी महाराजांनी हे किल्ले महसुलासाठी नव्हे, तर स्वराज्य उभारण्यासाठी वापरले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच हे किल्ले आजही प्रेरणास्थान आहेत,” असं फडणवीस म्हणाले.
मुंबई सेंट्रलला नवं नाव?
याच निवेदनात मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली – मुंबई सेंट्रल स्थानकाला “नाना जगन्नाथ शंकर शेठ” यांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
“सीएसटीएम स्टेशनचं भव्य रूपांतर सुरू आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचवेळी, मुंबई सेंट्रल स्टेशनला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात प्रस्ताव पाठवण्यात आला. हा प्रस्ताव सध्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
‘राजमुद्रा’च्या विचाराचा जागतिक गौरव
युनेस्कोच्या बैठकीत “राजमुद्रा” व शिवकालीन स्थापत्यशैलीचा सखोल अभ्यास झाला. “पॅरिसमध्ये झालेल्या सादरीकरणात शिवरायांच्या युद्धनीती, जलदुर्ग, डोंगरी किल्ले यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. काळाच्या पुढचा विचार ही संकल्पना यामुळे अधोरेखित झाली,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या शौर्याचा जागतिक सन्मान
ही घोषणा होताच संपूर्ण राज्यात शिवप्रेमींमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. मराठा साम्राज्याच्या शौर्य, कर्तृत्व आणि स्थापत्यकलेचा जागतिक स्तरावर गौरव झाल्याने आता हे किल्ले जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे उठून दिसणार आहेत.