
सोलापूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १० लाख ८७ हजार महिलांच्या खात्यात जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता सोमवारी (ता. ७) जमा करण्यात आला आहे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत निर्माण झालेल्या अडचणी आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी यामुळे येत्या काळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
या योजनेनुसार प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत लाभार्थींना आर्थिक मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, जानेवारी २०२५ पासून ही रक्कम वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत. परिणामी, अनेक लाभार्थींनी ‘संजय गांधी निराधार योजनेचा’ लाभ पुन्हा सुरू ठेवावा, अशा मागण्या केल्या आहेत.
अपात्र ठरण्याची टांगती तलवार
राज्य शासनाने आयकर विभागाकडून अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांची माहिती मागविली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर लाखो महिलांना योजनेतून अपात्र ठरविण्यात येण्याची शक्यता असून, यासाठी संबंधित महिलांनी स्वत:हून लाभ बंद करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
जुलैचा हप्ता लांबणीवर?
जूनचा हप्ता जुलैमध्ये जमा झाल्याने जुलै महिन्याचा हप्ता आणखी उशिरा मिळेल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. नियमितता राखण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
नव्या लाभार्थ्यांवर अन्याय?
दरम्यान, मागील वर्षभरात १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव्या महिलांना योजनेत अर्ज करता येत नाही. कारण संकेतस्थळावर त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्याचबरोबर, मयत लाभार्थ्यांचे खाते बंद करण्याची यंत्रणा अद्याप कार्यान्वित नसल्यामुळे अनेक मृत महिलांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
राज्य शासनाने योजनेच्या पारदर्शकतेसाठी कठोर उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे, अन्यथा लाडक्या बहिणींच्या नावावर सुरु असलेल्या या योजनेत विश्वासाचा तुटलेला दुवा पुन्हा जोडणं अवघड होईल.