
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील नगर परिषद सेवेतील गट ‘क’ मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अखेर दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) ७ जुलै २०२५ रोजी नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
हा निर्णय विशेषतः नगरपरिषद राज्यसेवेतील गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा नियुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या वारसांना यामुळे आता न्याय मिळणार असून, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे जीवन सावरण्यास मोठा आधार मिळणार आहे.
जीआरमध्ये नेमकं काय?
नवीन शासन निर्णयानुसार, नगर परिषद आस्थापनावरील सेवांतील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही नियुक्ती राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजीच्या कार्यपद्धतीच्या अधीन राहून केली जाईल.
विशेष बाब म्हणजे, लिपिक या पदासाठी नियुक्तीच्या अटी व वेतनश्रेणी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
६ व्या वेतन आयोगानुसार: ₹5200–20200 वेतनश्रेणी + ₹1900 ग्रेड पे
७ व्या वेतन आयोगानुसार: ₹19900–63200 वेतनश्रेणी
याचबरोबर, या नियुक्त्या करताना राज्यस्तरीय संवर्गासाठी अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया व निकषांची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही निर्देश या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
वर्षानुवर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी!
या निर्णयामुळे अनुकंपा नियुक्तीसाठी वर्षानुवर्षे धडपडणाऱ्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वारस प्रलंबित नियुक्त्यांमुळे अडचणीत होते, मात्र आता शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
“हा निर्णय सामाजिक भान ठेवून घेतलेलं महत्त्वपूर्ण पाऊल असून, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक आधार देणारा ठरेल,” असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.
संबंधित जीआर नगर विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.