
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मराठी माणूस बाहेर काढल्याचा आरोप आमच्यावर करतात, पण आम्हीच इथेच गाडणार, इथेच ठेचणार! असा शब्दांचा बाण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सत्ताधाऱ्यांवर सोडला. आझाद मैदानात सुरु असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी त्यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि आक्रमक भाषणातून सरकारवर जोरदार टीका केली.
“त्यांना मुंबई हवीय, कारण त्यांना माहिती आहे की मुंबई म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. एकदा मुंबईचा गळा घोटला की त्यांचं काम झालं. म्हणूनच मराठी-अमराठी असा भेद करून आपल्यात फूट पाडण्याचा डाव सुरू आहे,” असं ठाकरेंनी ठासून सांगितलं.
“शिवसेना तुमच्याच पाठीशी”
गिरणी कामगारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडलं नसतं, तर आज ही खुर्ची सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली नसती. आज जे मुंबईकरांना बाहेर काढायला निघालेत, ते दिल्लीच्या मालकांचे नोकर आहेत. त्यांना मुंबई लुटायची माहीत आहे, पण मुंबईसाठी रक्त सांडायचं नाही.”
वचन देतो, तुमचा हक्क हिरावू देणार नाही
“मी आज इथे वचन द्यायला आलोय. जे काही आपण आमच्या सरकार असताना कबूल केलं होतं, ते पूर्ण न झाल्यास शांत बसणार नाही. तुमचा हक्काचा निर्णय घेईपर्यंत मी तुम्हाला एकटा सोडणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिली.
“भाजपला करंट द्या!”
सरकारवर हल्ला चढवत ठाकरे म्हणाले, “त्यांना वाटतं त्यांनी आपला करंट काढला, पण आता आपण सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की ते सत्तेच्या खुर्चीतून उडून पडले पाहिजेत.”
संघर्ष आमचा धर्म – उद्धव ठाकरे
मराठी माणूस एकवटल्यावर कोणत्याही सत्तेचा सामना करू शकतो, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. “शिवसेना ही तुमच्याचसाठी आहे, तुमच्याचसाठी लढते आणि शेवटपर्यंत सोबत राहणार,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.