
मुंबई प्रतिनिधी
वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना अनेक वाहतूक पोलिसांकडून ई-चलान यंत्रणेकडे दुर्लक्ष करत खासगी मोबाईलवरून छायाचित्रे घेण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत वाहतूक संघटनांकडून तक्रारी वाढल्यानंतर अखेर वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी कारवाईचे आदेश जारी केले आहेत. यापुढे खासगी मोबाईलवरून छायाचित्र घेतल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
२ जुलै रोजी विधान भवनात परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांकडे ई-चलानसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध असतानाही अनेक अधिकारी व कर्मचारी खासगी मोबाईलचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, खासगी मोबाईलद्वारे एकाचवेळी अनेक वाहनांचे फोटो घेऊन नंतर निवडकपणे ई-चलान पाठवले जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना ई-चलान यंत्रणेचा वापर करूनच छायाचित्र घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांना पूर्वसूचना दिली होती
या प्रकारावर आधीच पोलिस अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेकांनी खासगी मोबाईलचा वापर सुरूच ठेवला. त्यामुळे आता थेट शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश साळुंके यांनी दिले आहेत.
या आदेशामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल होणार असून, नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना आता शिक्षा अनिवार्य ठरणार आहे. वाहतूक शाखेतील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.