
सांगली प्रतिनिधी
सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आयटी कंपनीतील आरामदायक नोकरी सोडून देशसेवेच्या मार्गाला प्राधान्य दिलेल्या सांगलीच्या एका तरुणाचा प्रवास दुर्दैवाने वीरमरणाने संपला आहे. पलूस (जि. सांगली) येथील २५ वर्षीय लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांचं प्रशिक्षणादरम्यान आकस्मिक निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
लेफ्टनंट अथर्व कुंभार हे बिहारमधील गया येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (OTA) प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षणाचा अंतिम टप्पा असलेल्या २० किमीच्या धावण्याच्या सत्रादरम्यान त्यांना उष्माघाताचा (हिट स्ट्रोक) झटका बसला. उपचाराआधीच त्यांचं निधन झालं. सैन्यदलाच्या नियमानुसार त्यांना वीरमरणाचा दर्जा देण्यात आला आहे.
IT नोकरी सोडून थेट सैन्यात
अथर्व कुंभार यांनी इन्फोसिस कंपनीत दोन वर्षे यशस्वी नोकरी केली होती. मात्र, देशसेवेच्या आवडीतून त्यांनी ती नोकरी सोडली आणि थेट सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अथर्व यांना थेट लेफ्टनंट पदावर संधी मिळाली आणि त्यांनी ती लीलया स्वीकारली. प्रशिक्षण सुरू होऊन अवघे तीन महिनेच झाले होते, तेवढ्यातच ही दुर्दैवी घटना घडली.
गावात अश्रूंनी अखेरचा निरोप
बिहारहून आलेल्या पार्थिवावर पलूसमध्ये सशस्त्र सैन्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा घरापासून मुख्य बाजारपेठ, जुना व नवीन बसस्थानक मार्गे स्मशानभूमीकडे निघाली. “भारत माता की जय”, “वीर जवान तुझे सलाम” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. नागरिक, युवकवर्ग, मित्रमंडळी, नातेवाईक, अधिकारी आणि नेत्यांनी अश्रूपूरित श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसंदेश आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अथर्व यांच्या निधनामुळे कुंभार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व कुटुंबीय आहेत.
त्यांच्या निधनाबाबत आमदार विश्वजीत कदम यांनी फेसबुकवर पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली. “पलूसच्या सुपुत्राचं हे वीरमरण संपूर्ण समाजासाठी मोठं दुःख आहे. या दुःखात आम्ही सर्वजण कुटुंबियांसोबत आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.
शौर्य, समर्पण आणि बलिदानाचं प्रतीक ठरलेले अथर्व आज प्रत्येकाच्या मनात अजरामर झालेत. त्यांच्या देशप्रेमाला आणि बलिदानाला संपूर्ण महाराष्ट्रातून सलाम.