
सांगली प्रतिनिधी
सांगली शहरात भरदिवसा झालेल्या निर्घृण खून प्रकरणाची उकल करत शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत थरारक कारवाईत चार जणांना ताब्यात घेतले. यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश असून, उर्वरित दोघे करण महादेव गायकवाड (वय २०, रा. राजीव गांधी नगर, सांगली) आणि युवराज हणमंत कांबळे (वय १९, रा. टिंबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) अशी अटकेत आलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे सांगलीकरांमध्ये एकाच वेळी धक्का आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
खून झालेल्या सौरभ बापू कांबळे (वय २०) याच्यावर यापूर्वीही मारामारीसह दोन गुन्हे दाखल होते. तो वाल्मिकी आवास योजना परिसरात राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याचं करण गायकवाडसह संशयितांशी वाद झाला होता. त्याच वादाचा सूड उगवत संशयितांनी सोमवारी दुपारी बिल्डिंग क्रमांक ७ च्या पाठीमागे त्याच्यावर एडका आणि दगडाने अमानुष हल्ला केला. डोकं, मान, हात यावर जबर मारहाण करण्यात आली. गळ्यावर बसलेल्या घावामुळे सौरभ याच जागी कोसळला आणि रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर संशयित पसार झाले. माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक सक्रिय झाले. पोलिस उपाधीक्षक विमला एम., शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाच्या सूचना दिल्या.
त्याअनुसार एक पथक सक्रिय होत संशयितांचा माग काढत होते. तपासादरम्यान आरोपी करण गायकवाड आणि युवराज कांबळे हे अन्य दोन अल्पवयीनांसह टिंबर एरिया येथील बंद पडलेल्या गोदामात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंमलदार संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांनी माहितीच्या आधारे तात्काळ छापा टाकत चौघांनाही ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत त्यांनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, योगेश पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, प्रशांत पुजारी, विशाल कोळी, योगेश हाक्के, संदीप कोळी, गणेश कोळेकर, दिग्विजय साळुंखे आणि रमेश लपाटे यांनी पार पाडली.
या झपाट्याने उलगडलेल्या प्रकरणामुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.