
सांगली प्रतिनिधी
सांगली | भरधाव एसटी बसने अपघाताची मालिका सुरूच ठेवली आहे. काल सकाळी तरुणीला चिरडून मृत्यू ओढवणाऱ्या या मार्गावर आज पुन्हा एका दुचाकीस्वारास एसटीने धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून, सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिव्हिल चौकात हा प्रकार घडला. वैभव गुरूदत्त कोळी (२१, रा. हनुमान कॉलनी, सांगली) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
काल सकाळी जय मातृभूमी व्यायाम मंडळाजवळ शर्वरी राजकुमार कुलकर्णी या तरुणीचा एसटी बसच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. पालिकेकडून सकाळी काही अतिक्रमणे हटविण्याचा फार्स करण्यात आला. मात्र वाहतूक नियंत्रण व सुरक्षेच्या उपाययोजना झाल्याचे चित्र नव्हते.
आज रात्री राममंदिर चौकातून कोळी हे दुचाकी (एमएच-१० सीई-९४२३) घेऊन सिव्हिल हॉस्पिटलकडे जात असताना कोल्हापूर-माजलगाव एसटी बस (एमएच-२० बीएट-२७४०) भरधाव वेगाने आली. सिव्हिल चौकात बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत कोळी काही अंतर फरफटत गेले. त्यानंतर चालकाने बस थांबवली.
अपघातानंतर परिसरात प्रवासी व नागरिकांची मोठी गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोळी यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणाची नोंद प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वाहतूक व्यवस्थेतील हलगर्जीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.