
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू राहणार असून, कोणतीही सुट्टी घोषित करण्यात आलेली नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्टपणे जाहीर केले आहे.
याआधी काही शिक्षक संघटनांनी या दोन दिवशी आंदोलनाचे आवाहन केल्यामुळे शाळा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.
शिक्षक संघटनांचे आंदोलन, पण विद्यार्थ्यांचा विचार महत्त्वाचा
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दोन दिवसांच्या आंदोलनाची हाक दिली होती. त्याचा परिणाम शाळांच्या कामकाजावर होणार असल्याची चर्चा होती. तथापि, शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश काढत कोणतीही शाळा बंद होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध असून, शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनावरील भूमिका वेगळी असली तरी, शाळा नियमित सुरू राहतील, असे विभागाने सांगितले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या आदेशाची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मागील आंदोलन, अधूरी आश्वासने आणि पुन्हा आंदोलनाचा इशारा
गेल्या वर्षी राज्यभरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ७५ दिवसांचे लांबलेले आंदोलन केले होते. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानित शाळांसाठी पुढील टप्प्यात निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या GR मध्ये अनुदानित शाळांसाठी कोणताही निधी निश्चित करण्यात आलेला नव्हता, ज्यामुळे शिक्षक वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळेच पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम नाही
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने वेळीच हस्तक्षेप करत शाळा नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जो विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शिक्षणव्यवस्था सुरळीत राखण्याचा विभागाचा प्रयत्न असला तरी, शिक्षकांच्या मागण्या आणि आंदोलन यांचा परिणाम पुढील काळात कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.