
मुंबई प्रतिनिधी
मुंबईची शान समजली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा प्रचंड गर्दीच्या चर्चेत आली आहे. सोमवारी सकाळी, ७ जुलै रोजी घाटकोपर रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर भयावह गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, दृश्य पाहून सामान्य नागरिकांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
गर्दी इतकी होती की स्टेशनवर मुंगी शिरण्याचीही जागा उरलेली नव्हती. प्रवाशांनी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. काहींनी एस्केलेटरचा मार्ग वापरत मेट्रो गाठण्याचा प्रयत्न केला, तर काही प्रवासी लोकलमध्ये चढण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये जबरदस्तीने उडी मारताना व्हिडिओत दिसून आले. परिस्थिती इतकी बिघडली होती की, एक जरी प्रवासी तोल जाऊन पडला असता तर मोठी जीवितहानी झाली असती.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ठाणे स्थानकावर घडलेल्या दुर्घटनेमध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर घाटकोपर स्थानकावरील ही घटना अधिकच गंभीर ठरते आहे. व्हिडिओमधून दिसणारी गोंधळलेली परिस्थिती ही सध्या प्रवाशांचे “नवे सामान्य” बनल्याचे चित्र आहे.
लोकांचा संताप सोशल मीडियावर उफाळला
या घटनेनंतर सोशल मीडियावर मुंबईकरांचा संताप उफाळून आला आहे. अनेकांनी प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची मागणी केली असून, काहींनी प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनावरही टीका केली आहे. “अरे हे तर रोजचंच झालंय, आम्ही जगायचं की नाही?” असा संतप्त सवाल एका नागरिकाने उपस्थित केला.
Crazy commuter woes thanks to 1 service withdrawn tech issues with mumbai metro line 1 Stampede like situation in ghatkopar station@Dev_Fadnavis @CMOMaharashtra act fast before lives are lost Line 1 needs 6 bogie rakes & 3 times current rakes@MandarSawant184@BHiren@impuni… pic.twitter.com/bn0ujkJhBT
— ANDHERI LOKHANDWALA OSHIWARA CITIZEN'S ASSOCIATION (@AndheriLOCA) July 7, 2025
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनांमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. लोकल ट्रेनमधील अनियंत्रित गर्दी, अपुरी यंत्रणा आणि वाढती लोकसंख्या यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
उपाययोजना केव्हा?
दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलवर अवलंबून असताना, अशी परिस्थिती पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अतिरिक्त फेऱ्या, प्लेटफॉर्म व्यवस्थापन, गर्दी नियंत्रणासाठी यांत्रिक उपाय, आणि मेट्रो सेवेशी अधिक परिणामकारक समन्वयाची गरज अधोरेखित होत आहे.
मुंबईची ‘लाईफलाईन’ प्रवाशांच्या जिवावर बेतू नये यासाठी सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने आता गांभीर्याने पावले उचलणं अत्यंत आवश्यक आहे.