
ठाणे प्रतिनिधी
रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात आता ठाणेकर प्रवाशांचे अस्त्र सज्ज झाले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवलेल्या भाडेदरांपेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या, उद्धट वागणाऱ्या, भाडे नाकारणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाईसाठी 9423448824 हा विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे. यामुळे आता प्रवाशांना ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची थेट सुविधा उपलब्ध झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांच्या बेफिकिरीबाबत तीव्र नाराजी होती. ठरवलेल्या दरापेक्षा अधिक भाडे वसूल करणे हे तर रोजचेच झाले असून, काही रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धटपणे वागत असल्याच्या तक्रारींनी परिवहन विभागाचे लक्ष वेधले होते.
अलीकडेच सीएनजी रिक्षांसाठी 1.5 किलोमीटर अंतरासाठी किमान 26 रुपये एवढे नवे भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, काही चालक त्याहीपुढे जात प्रवाशांना गंडवत असल्याचे उघड झाल्यानंतर विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
तक्रार कशी कराल?
तक्रार करताना प्रवाशांनी संबंधित रिक्षाचा क्रमांक, शक्य असल्यास फोटो, आणि इतर महत्त्वाचे तपशील व्हॉट्सॲपवर पाठवायचे आहेत. विभागाने स्पष्ट केले आहे की, प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल.
अधिकृत भाडेदर सर्वत्र उपलब्ध
परिवहन विभागाने सर्व रिक्षा स्टँडवर अधिकृत भाडेदरांचे तक्ते लावले असून नागरिकांनी प्रवासापूर्वी ते नक्की पाहावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे. कोणताही नियमभंग निदर्शनास आला, तर प्रवाशांनी तात्काळ व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.