
मुंबई प्रतिनिधी
“आजपासून सुरुवात झाली आहे…,” असं ठामपणे सांगत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी डोम येथे पार पडलेल्या विजयी मेळाव्यात महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सूर छेडला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या रणधुमाळीची नांदी होत असल्याचे स्पष्ट संकेत देत त्यांनी भाजपवर तोफ डागली.
“परवा मी राजला फोन केला, जसं काही पिक्चरचा प्रमियर असल्यासारखं सगळे विचारत होते – ‘आज येऊ का?’ पण हे केवळ एकत्र येणं नाही, ही आजपासून सुरुवात आहे!” — अशा शब्दांत त्यांनी उपस्थित जनतेला जागं केलं.
भाजपवर बोचरी टीका; ‘श्रीखंड बासुंदी खा, पण मुलगी पळवून नेऊ नका’
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवत म्हटलं, “मी नेहमी सांगतो, कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका. श्रीखंड बासुंदी खातील, नवरा-बायकोत भांडण लावतील, आणि दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. एवढंच नव्हे तर पोरीलाही पळवून घेतील!” — अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी भाजपच्या स्वार्थी राजकारणावर प्रहार केला.
“मराठी माणसांनो, आता एकत्र या!”
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जशी एकजूट झाली होती, तशीच आता पुन्हा एकदा मराठी माणूस एकत्र यायला हवा,” असं करत ठाकरे यांनी जाती-धर्मापलीकडे मराठी एकतेचे आवाहन केलं. “मराठा, ब्राह्मण, स्पृश्य-अस्पृश्य, घाटी-कोकणी, ९६-कुळी – हे सारे मतभेद विसरून मराठी ठसा उमटवा. तुटू नका, फुटू नका आणि मराठी ठसा पुसू देऊ नका!”
‘शेतकऱ्याच्या गळ्यात नांगर, मोदींना घाण्याचा तारा!’
“माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बैल परवडत नाही, गळ्यात नांगराचं जोखड घालून फिरतोय… आणि आमचे पंतप्रधान ‘स्टार ऑफ घाणा’ होतायत? हे पाहून लाज वाटली पाहिजे!” — शेतकऱ्यांच्या दु:स्थितीकडे लक्ष वेधताना त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
‘मराठी भाषा भवन कुठे? रंगभूमी दालन कुठे?’
“मराठी रंगभूमी दालनाचा आराखडा केराच्या टोपलीत टाकला. मालकाच्या मित्राच्या घशात ती जागा घातली. मराठी भाषा भवनाचं काय झालं? हा का तुमचा मराठी अभिमान?” — असा संतप्त सवाल करत ठाकरे यांनी प्रशासनाची आणि अजित पवार यांचीही कानउघाडणी केली.
‘जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांचा अनुयायी असू शकत नाही’
“हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक कसा? ‘आपला मालक आला म्हणून जय गुजरात’ म्हणणारे तुमचे लोक – हे तुमचं राजकारण आहे का?” — असं म्हणत त्यांनी भाजपमधील मराठी विरोधकांचा पर्दाफाश केला.
‘मुंबई विकली जातेय, हनुमान चालिसा चालते पण…’
“मुंबईची चिंदडी उडवली जात आहे, अदानीकडे सगळ्यात जास्त जागा आहे. हनुमान चालिसाला विरोध नाही, पण मारुती स्तोत्र विसरायला लावताय का?” — अशा शब्दांत त्यांनी ‘धर्मा’च्या नावाखाली मराठी अस्मिता गिळंकृत होण्यावर तीव्र रोष व्यक्त केला.
‘मराठी माणूस इतर राज्यात दादागिरी करत नाही’
“फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही… मग मला एक मराठी माणूस दाखवा जो इतर राज्यात जाऊन गुंडगिरी करतो. बंगाल, तामिळनाडूला जाऊन बघा, तिथं बाहेरचा माणूस असं काही करत नाही. पण महाराष्ट्रात बाहेरचे येतात आणि तमाशा करतात!”
उद्धव ठाकरे यांचा स्पष्ट इशारा – ‘आता मराठी माणूस एकत्र येणार, आणि हे सगळं खपवून घेणार नाही!’
वरळीच्या मंचावरून उद्धव ठाकरेंनी आज केवळ भाषण केलं नाही, तर महाराष्ट्रात नवचैतन्याचा हुंकार दिला. एक मराठी, ठाम मराठी, अभिमानी मराठी, अशा नव्या चळवळीची सुरुवात जणू आजपासून झाली आहे.