
मुंबई प्रतिनिधी
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सर्वसामान्यांचे लक्ष राज्यातील नेत्यांच्या संपत्ती आणि अधिकारांवर केंद्रित झाले आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक आणि लक्षवेधी माहिती समोर आली आहे, महाराष्ट्रातील एक आमदार एवढा श्रीमंत आहे की त्याने देशातील सर्वच राजकारण्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे!
होय, घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार पराग शहा सध्या देशातील सर्वाधिक श्रीमंत आमदार ठरले आहेत. त्यांच्या ताज्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 3,353.06 कोटी रुपये एवढी प्रचंड संपत्ती आहे.
विशेष म्हणजे, 2019 मध्ये पराग शहा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात फक्त 550 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे अवघ्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे.
अजित पवारांपेक्षा 27 पट श्रीमंत!
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या एकूण संपत्तीची रक्कम सुमारे 124 कोटी रुपये असून त्यांच्यावर जवळपास 22 कोटींचे कर्ज आहे. त्याच्या तुलनेत पराग शहा हे 27 पट अधिक श्रीमंत असल्याचे स्पष्ट होते.
रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठं नाव
पराग शहा हे मुंबईतील प्रतिष्ठित बिल्डर असून ‘मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ या बांधकाम कंपनीचे प्रमुख आहेत. तसेच, एमआयसीआय ग्रुपचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत.
संपत्तीचे तपशील असे
* जंगम संपत्ती: ₹3,315 कोटी
* अचल संपत्ती: ₹67 कोटी
* स्वतःच्या नावावर: ₹2,179 कोटी
* पत्नीच्या नावावर: ₹1,136 कोटी
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही सर्व माहिती समोर आली असून, पुन्हा एकदा पराग शहा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अंबानी-अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींना टक्कर देणाऱ्या संपत्तीच्या बळावर पराग शहा हे देशातील सर्व राजकारण्यांमध्ये वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत, हे निश्चित!