
पनवेल, प्रतिनिधी
बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या नवी मुंबईतील एनआरआय पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांच्या विरोधात आता त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल 297 टक्के अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने कदम यांच्याविरुद्ध उलवे पोलिस ठाण्यात अपसंपत्तीचा (Disproportionate Assets) गुन्हा दाखल केला आहे.
चार लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक
सतीश कदम यांना सप्टेंबर 2024 मध्ये बांधकाम व्यावसायिक महेश कुंभार याच्याकडून चार लाख रुपयांची लाच घेताना उलवे परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटवर छापा टाकत ACB पथकाने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि घरगुती सामान जप्त केले होते.
सहा महिन्यांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड
या घटनेनंतर ACBच्या महासंचालकांच्या आदेशावरून कदम यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यात आली. मुंबई युनिटचे पोलिस निरीक्षक कृष्णा मेखले व त्यांच्या पथकाने सहा महिन्यांच्या तपासाअंती निष्कर्ष काढला की, सतीश कदम यांनी 1 डिसेंबर 2013 ते 9 ऑक्टोबर 2024 या सेवाकालात आपल्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल 3 कोटी 48 लाख 40 हजार रुपयांची अपसंपत्ती जमवली आहे.
गैरमार्गाने संपत्ती संचयाचा आरोप
कदम यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून स्वतःच्या तसेच पत्नी आणि मुलाच्या नावावर ही संपत्ती बेकायदेशीर मार्गाने जमवल्याचे ACBच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
फ्लॅट्स, प्लॉट, कार्स आणि रोख रक्कम जप्त
सतीश कदम यांच्या नावे उलवे सेक्टर-23 मधील ऑर्चिड हाइट्समध्ये दोन फ्लॅट्स (701 आणि 704), तसेच उलवे सेक्टर-25 येथे पत्नी व मुलाच्या नावावर सुमारे 170 चौरस मीटरचा भूखंड आहे.
याशिवाय, सदनिकांमध्ये 82 हजार आणि 3 लाख 40 हजार रुपयांचे घरगुती सामान, 48 लाख रुपयांची रोख रक्कम, 245 ग्रॅम सोने, तसेच कदम यांच्या नावावर एक कार, त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावावरही आलिशान कार असल्याचे समोर आले आहे.
ACB कडून पुढील चौकशी सुरू
या सर्व तपासाअंती ACB ने उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सतीश कदम यांच्यावरील गैरव्यवहारांचा तपास सध्या सुरू आहे.