
सांगली प्रतिनिधी
बारावीच्या सराव परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे शिक्षक वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीचा अमानुष छळ करत तिला मृत्यूच्या दारात ढकलल्याची धक्कादायक घटना नेलकरंजी येथे शुक्रवारी रात्री घडली. साधना धोंडीराम भोसले या विद्यार्थिनीचा मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे.
“तुला एवढे कमी मार्क कसे मिळाले?” इतक्या साध्या प्रश्नाच्या क्रूर परिणतीमुळे एक घर उद्ध्वस्त झालं.
मुख्याध्यापक असलेल्या धोंडीराम भोसले यांना मुलगी साधनाने सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याची माहिती मिळताच संताप अनावर झाला. रात्री ९.३० च्या सुमारास त्यांनी घरात असलेल्या लाकडी खुंट्याने मुलीला बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी उपचारासाठी सांगलीच्या उषःकाल रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
स्वप्न रंगवत होती वैद्यकीय शिक्षणाचं…
साधना ही आटपाडी येथील विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थिनी होती. डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती NEET परीक्षेची तयारी करत होती. नुकत्याच झालेल्या सराव परीक्षेत ३० पैकी १९ आणि गट विषयांमध्ये ७२० पैकी १७३ गुण मिळाले होते. मात्र, हे गुण धोंडीराम भोसले यांना अपमानास्पद वाटले.
साधनाने उलट उत्तर दिलं – “पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते, तुम्ही कुठे कलेक्टर झालात?”
हे ऐकून धोंडीराम संतापले व त्यांनी तिच्यावर हात उचलला.
अक्षर होतं मोत्यासारखं… मन मात्र कोमेजलं
साधना अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिच्या शाळेतील शिक्षकांनीही तिच्या स्वच्छ आणि देखण्या अक्षरांची प्रशंसा केली होती. बारावीच्या मुख्य परीक्षेत तिला ९२ टक्के गुण मिळाले होते. पण एका चुकीच्या सराव परीक्षेतील गुणांमुळे तिचं आयुष्यच संपलं.
एक शिक्षणप्रेमी बाप… की विकृत अहंकारी पुरुष?
शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले यांनी शिक्षणासाठी शिस्त महत्त्वाची मानली. पण हीच शिस्त त्यांनी अमानुषपणे मुलीवर लादली. आपले अपयश झाकण्यासाठी कदाचित ते मुलीच्या यशाची झळ सहन करू शकले नाहीत.
पोलीस तपास सुरू असून, धोंडीराम भोसले यांच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली असून, सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे.