
सातारा प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आज भव्य स्वागत झाले. पाडेगाव (ता. खंडाळा) येथे टाळ मृदंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या लाटांमध्ये आणि हरिनामाच्या जयघोषात माउलींच्या पवित्र पालखीने जिल्ह्यात प्रवेश केला. भक्तीरसात चिंब न्हालेल्या हजारो वारकऱ्यांनी साताऱ्याची भूमी धन्य केली.
या पवित्र प्रसंगी जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून माउलींचे स्वागत केले. खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते.
या आधी गुरुवारी सकाळी पालखीने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान केले. जिल्ह्याची सीमा ओलांडताना नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान विधी पार पडला. त्यानंतर पालखी पुन्हा रथात ठेवण्यात आली आणि पाडेगावमध्ये आगमन झाल्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, वैद्यकीय सेवा, स्वच्छतागृहे तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वारकरी संप्रदायाच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा हा महोत्सव सातारा जिल्ह्यात आता आणखी रंग घेणार आहे. माउलींच्या नामस्मरणात हरिभक्त लीन होत आहेत, आणि “ज्ञानोबा माउली तुकाराम”चा गजर दुमदुमत आहे.