
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील शंभरहून अधिक वर्षे जुने ब्रिटिशकालीन पूल अजूनही वापरात असून, प्रत्येक पावसाळ्यात त्यांची सुरक्षितता ही चिंता बनून समोर येते. यंदा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने या मुद्याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बांधकाम विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत त्यांनी राज्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील २५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या पुलांचे, साकवांचे आणि शासकीय इमारतींचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या सर्व स्थळांचा वस्तुस्थितीवर आधारित अहवाल तातडीने शासनास सादर करण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
“जिथे परिस्थिती धोकादायक वाटेल, तिथे तात्काळ उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे कोणतीही दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी,” असा स्पष्ट इशाराही शिवेंद्रसिंहराजेंनी दिला.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक जुने, जीर्ण पूल व साकव यांच्याबाबत योग्य निर्णय घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे.
वारीसाठी रस्ते खड्डेमुक्त करणार
दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झालेला असून, वारकऱ्यांच्या सुरळीत प्रवासासाठी वारी मार्गावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना देखील शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“वारी मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी. वारकऱ्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी रस्ते दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलावीत,” असे निर्देश त्यांनी दिले.
या निर्णयांमुळे साताऱ्यातील जुने पूल व साकव तसेच वारी मार्गावरील रस्ते यांचे प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता असून, लोकांच्या सुरक्षेसोबत श्रद्धेच्या वाटचालीसही चालना मिळणार आहे.