
सातारा प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या चार गुन्ह्यांचा छडा लावत २४ तोळे वजनाचे, सुमारे २३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तिघा आरोपींचा तपशील उघड केला असून, त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
१९ जून रोजी सकाळी वाईतील साक्षी हाइट्समधील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला.
पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे यांच्यासह तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास, घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
२४ जून रोजी तपास पथकाला आरोपी लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनोर, मिरज) याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती मिळाली. पुढील कारवाई करत पोलिसांनी दीपक संतोष पाटणे (२३, मूळ रा. वरवडी, ता. भोर, जि. पुणे) आणि आशुतोष उर्फ पप्पू प्रदीप भोसले (२७, मूळ रा. बावधन, ता. वाई) या दोघांना अटक केली. न्यायालयीन कोठडीत चौकशीत त्यांनी सातारा आणि वाई हद्दीत आणखी तीन घरफोड्यांची कबुली दिली.
या आरोपींकडून एकूण चार गुन्हे उघड झाले असून चोरीस गेलेले एकूण २३ लाख रुपये किमतीचे २४ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.
या कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलिस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे आदींचा मोलाचा सहभाग होता.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी तपास पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.