मुंबई प्रतिनिधी
कोल्हापुरात शिवसेनेच्या शिंदे गटाने मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला आहे. महापालिकेतील माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती व परिवहन समितीचे माजी सभापती अशा तब्बल २३ माजी नगरसेवकांनी काल मुंबईतील ‘मुक्ताई’ बंगल्यावर शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. या घडामोडींनी काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
गेल्या महापालिका सभागृहातील १४ नगरसेवकांसह शारंगधर देशमुख यांच्यासारखे काँग्रेसचे बडे नेतेही शिवसेनेत दाखल झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यात भगवा महापालिकेवर फडकवण्याचा निर्धार करण्यात आला.
शिंदेंनी दिला ‘करेक्ट कार्यक्रम’चा इशारा
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कोल्हापुरातील किंगमेकर आता शिवसेनेत आले आहेत. तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला. पुढे अनेकांचा कार्यक्रम करायचा आहे. शिवसेना ही कार्यकर्त्यांची सेना आहे. जो काम करतो तोच पुढे जातो.”ते पुढे म्हणाले, “कोल्हापूरचा विकास आमचा अजेंडा आहे. या नेतृत्वाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.”
आता शिवसेना शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले, “आजच्या प्रवेशामुळे शहराच्या सर्व दिशांना शिवसेना पोहोचली आहे. एवढी ताकद कोल्हापुरात याआधी कधीच नव्हती.”
शारंगधर देशमुखांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे ‘गेमचेंजर’
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “देशमुख यांच्या प्रवेशामुळे दक्षिण भागात शिवसेनेची मोठी ताकद निर्माण झाली आहे. आजच्या टप्प्यात २५ माजी नगरसेवक सामील झाले असून, पुढील टप्प्यात आणखी २५ येणार आहेत.”त्यांनी स्पष्ट केले की, “कोल्हापुरचा पुढचा महापौर आणि आमदार शिवसेनेचाच असेल.”
शपथ : भगवा फडकवल्याशिवाय थांबायचं नाही!
शारंगधर देशमुख म्हणाले, “कोल्हापुरचा अजूनही पुरेसा विकास झालेला नाही. प्रत्येक प्रभागात भरीव निधी दिला पाहिजे. आमची टीम भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. महापौर शिवसेनेचाच होईल, ही आमची शपथ आहे.”
प्रवेश केलेली माजी नेते मंडळी:
सुनील कदम, प्रतिभा नाईकनवरे (माजी महापौर), दिगंबर फराकटे (उपमहापौर), निलोफर आजरेकर, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, सुनंदा मोहिते, गीता गुरव, अनुराधा खेडकर, अभिजित चव्हाण, रिना कांबळे, सीमा कदम, अर्चना पागर, कविता माने, सत्यजित कदम, संभाजी जाधव, प्रकाश नाईकनवरे, संगीता सावंत, जहाँगिर पंडत, भरत लोखंडे, आनंदराव खेडकर, रशीद बारगीर.
नाट्यमय वळण : महेश आणि लता कदम यांचा प्रवेश नाकारला
या प्रवेश सोहळ्यात एक नाट्यमय वळणही पाहायला मिळाले. आमदार क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार माजी नगरसेवक महेश कदम आणि लता कदम यांचा प्रवेश शेवटच्या क्षणी नाकारण्यात आला. यादीतून त्यांचे नाव पेनाने खोडण्यात आल्याची माहिती आहे.
कोल्हापुरात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने केलेली ही खेळी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बुरुजाला सुरुंग लागला असून, भाजपही बचावच्या भूमिकेत गेला आहे. आता शिवसेना महापालिकेवर भगवा फडकावणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


