
मुंबई प्रतिनिधी
६०,००० कोटी रुपयांचा गाजावाजा, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेलं भव्य उद्घाटन, आणि अवघ्या काही आठवड्यांत समृद्धी महामार्गावर खड्ड्यांचा डोंगर! अमणे (भिवंडी) ते इगतपुरी (नाशिक) दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील शहापूर एक्झिटजवळील सिमेंट काँक्रीटच्या पुलावर खड्डे पडले असून वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहापूर परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांनी या खड्ड्यांचे फोटो थेट सोशल मीडियावर शेअर करत प्रशासनाच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. महामार्गाचे उद्घाटन ५ जून रोजी मोठ्या थाटात करण्यात आले होते, परंतु एवढ्या अल्पावधीतच या महामार्गाची गुणवत्ता उघड झाली आहे.
कामाच्या गुणवत्तेवर शंका, तरीही जबाबदारीची ढकलाढकल
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “खड्डे जेथे पडले आहेत तो भाग लहान पुलाच्या काँक्रीट संरचनेवर लावलेला बिटुमेन थर होता. हा थर खराब झाला होता, मात्र आता तो नव्याने तयार करण्यात आला आहे. पुलाची मूळ काँक्रीट रचना सुरक्षित आहे.”
ते पुढे म्हणाले, “रोज देखभाल केली जाते आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे.” मात्र, प्रत्यक्षात वाहनचालकांना जी परिस्थिती भोगावी लागत आहे, ती प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
तत्पुरत्या व्यवस्थेचा फज्जा, वाहतूक कोंडीची शक्यता
सध्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे कॉरिडॉरमध्ये क्लोव्हर लीफ जंक्शनचं बांधकाम अपूर्ण असल्याने जुन्या नाशिक महामार्गावरून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. अमणे गावाजवळ असलेल्या तात्पुरत्या रस्त्याने डावीकडे वळावे लागते आणि त्यानंतर ६०० मीटरवर अंडरपासद्वारे यू-टर्न घेत नागपूर दिशेने प्रवास करावा लागतो.
या तात्पुरत्या मार्गामुळे वाहनांच्या गर्दीची शक्यता वाढली असून, योग्य नियोजनाचा अभाव असल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते.
सवाल एकच — एवढ्या खर्चानंतरही ‘समृद्धी’ कोठे?
समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी प्रगतीचा मार्ग मानला जातो. पालघरच्या वाढवण बंदरापासून गडचिरोलीपर्यंत हा महामार्ग विस्तारला जाणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. पण, या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत सुरूवातीलाच जे प्रश्न निर्माण झाले आहेत, ते संपूर्ण व्यवस्थेचं आणि निधी वापराच्या पारदर्शकतेचं मूल्यमापन करणारे ठरत आहेत.
सरकारने ज्या ‘समृद्धी’चे स्वप्न दाखवले होते, त्यात आता वाहनचालकांना खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा लागतो, ही खरोखरच चिंतेची बाब आहे.