
कराड प्रतिनिधी
पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलआवक कायम आहे. यामुळे कोयना शिवसागर जलाशयाचा साठा आता ३८.३३ अब्ज घनफूट (३६.४२%) इतका झाला असून, सातारा जिल्ह्यातील इतर सहाही प्रमुख धरणांत मिळून ५९.०८ अब्ज घनफूट म्हणजेच ३९.७२% साठा नोंदवला गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमुख धरणांची एकूण साठवण क्षमता १४८.७४ अब्ज घनफूट आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक जलसाठा होत असल्याने सिंचन, पाणीपुरवठा व वीजनिर्मितीच्या दृष्टीने दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (दि. २३) कोयना धरणात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत तब्बल १.४३ अब्ज घनफूट पाण्याची आवक झाली. या कालावधीत प्रति सेकंद १६,५५३ क्युसेक वेगाने पाणी कोयना धरणात प्रवेश करत होते. पाणलोट क्षेत्रात सरासरी ३६.३३ मिमी पावसाची नोंद झाली असून, कोयनानगरला ४० मिमी (एकूण ९११), नवजा ३३ मिमी (एकूण ९१२), तर महाबळेश्वरला ३६ मिमी (एकूण ८७६ मिमी) पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागांत जोरदार सरींची नोंद झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील तांदुळवाडी येथे सर्वाधिक ४६ मिमी, रेवाचीवाडी व पाडळी येथे ४४ मिमी, सांडवली येथे ४१ मिमी, तर भागोजी पाटलाचीवाडी येथे २३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच जमिनीतील अतिरिक्त ओलावा कमी होऊन सूर्यप्रकाश मिळावा, यासाठी शेतकरी आणि सामान्य जनतेचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. पावसाच्या या विश्रांतीची वाट आता शेतीसाठीही महत्त्वाची ठरणार आहे