
रत्नागिरी प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) चे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आज आपल्या राजकीय कारकिर्दीच्या संभाव्य समाप्तीचे सूतोवाच करत, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंडं फोडली आहेत. “आठ वेळा निवडून आलो… आता थांबावं असं वाटतं,” असे स्पष्ट करत त्यांनी निवृत्तीच्या दारात उभं असल्याचा स्पष्ट संकेत दिला.
गुहागर येथे पार पडलेल्या शिवसेना शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जाधव बोलत होते. आपल्या मंत्रिपदाच्या संधीवर त्यांनी स्पष्ट खंत व्यक्त केली. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, ही गोष्ट मनात राहते,” असे त्यांनी नमूद केले.
“मी हुजरेगिरी करणारा नाही” संजय राऊतांवर परखड शब्दांत नाराजी
संजय राऊत यांच्या काही विधानांवरही भास्कर जाधव यांनी ताशेरे ओढले. “मी कोणाचीही हुजरेगिरी करणारा कार्यकर्ता नाही. ना ला ना, आणि हो ला हो म्हणणारा कार्यकर्ता आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“संजय राऊत सतत असं सांगतात की, मला भाषण करण्याची संधी मिळत नाही, म्हणून मी नाराज आहे. पण तसं काही नाही. मला भाषण दिलं जातं, आदित्य ठाकरेनंतर मी तिसऱ्या क्रमांकावर बोलतो. माझ्यानंतर राऊत बोलतात आणि शेवटी उद्धव ठाकरे. त्यामुळे भाषणावरून नाराजीचा प्रश्नच नाही,” असा खुलासा त्यांनी दिला.
“शाखाप्रमुख हाच शिवसेनेचा कणा”
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर भाष्य करताना त्यांनी म्हटलं, “शिवसेनेचा खरा कणा म्हणजे शाखाप्रमुख. मात्र, आज त्या भूमिकेची उपेक्षा होते आहे. त्यामुळेच शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.”
जाधव यांनी स्पष्ट केलं की, “कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली म्हणून मी निवृत्त होत नाही. मी ३९ पैकी एकटा निवडून आलोय. मात्र, अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर आता स्वतःसाठी थांबायचा विचार मनात येतो आहे.”
या वक्तव्यांमुळे ठाकरे गटाच्या अंतर्गत घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे, तर भास्कर जाधव यांचे राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत पक्षाच्या पुढील डावपेचांवरही परिणाम करू शकतात.