
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
रत्नागिरी : देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील सोने व्यवसायिक धनंजय गोपाळ केतकर यांच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल 26 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास वांझोळे गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या कारने मर्सिडीजला धडक देत ती अडवली. त्यानंतर कारमधील पाच जणांनी धनंजय केतकर यांना जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत बसवले. त्यांच्या गळ्यातील 16 लाखांचे सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये रोख लुटून 5 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. शिवाय ‘पैसे न दिल्यास दरीत टाकू’ अशी धमकी देण्यात आली. अखेर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री त्यांना वाटुळ गावाजवळ सोडून देण्यात आले.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतंत्र तपास पथके नेमली. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना बदलापूर (ठाणे) येथून तर आणखी दोन जणांना पनवेल (नवी मुंबई) येथून अटक करण्यात आली.
मुद्देमाल जप्त
या आरोपींकडून स्कॉर्पिओ वाहन, पाच मोबाईल हँडसेट आणि 1 लाख 20 हजार रुपये रोख असा एकूण 26 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांची भूमिका
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, लांजा उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्यासह अधिकारी आणि अंमलदार,संदीप ओगले, पांडुरंग गोरे, नितीन डोमणे, विनायक राजवैद्य, विक्रम पाटील, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, प्रविण खांबे, विवेक रसाळ, योगेश शेट्ये, अतुल कांबळे, रमिज शेख, शितल पिंजरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, विजय आंबेकर, सत्यजित दरेकर, दिपराज पाटील, अमित कदम, भैरवनाथ सवाईराम, विनोद कदम, दत्ता कांबळे व निलेश शेलार सहभागी झाले होते.
या संयुक्त कामगिरीमुळे आरोपी जेरबंद झाले असून पुढील तपास देवरुख पोलिस करत आहेत.