
सातारा प्रतिनिधी
महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने साताऱ्यात ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६५ कर्तृत्ववान व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम साताऱ्यातील राजवाडा येथील पाठक हॉल येथे पार पडला.
या पुरस्कार सोहळ्यास सातारा जिल्हा कारागृहाचे पोलिस अधीक्षक शमाकांत शेडगे, सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सयाजीराव घाडगे आणि बार असोसिएशनच्या संयुक्त सचिव वंदना संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमात पत्रकार, लेखक, संपादक, समाजसेवक, शिक्षक, डॉक्टर्स, पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी, ब्रह्माकुमारी, तृतीयपंथी समाजसेविका, निवृत्त सैनिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये पत्रकार रविंद्र खवळे, नितीन खरात, शाहीर संभाजी जाधव, ब्रह्माकुमारी सुवर्णा दाते, संपादक शरद गाडे, रविंद्र कांबळे, समाजसेविका रजिया शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा शिकलगार, महिला सरपंच सविता ढवळे, आंतरराष्ट्रीय योगतज्ज्ञ उमा चौगुले, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू श्रीधरन मारी, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आम्रपाली मोहिते, आणि अनेकांचा समावेश होता.
या सोहळ्यात दीपक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील समाजोपयोगी कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शेलार यांनी सांगितले की, “समाजात सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांचं कार्य अधिक दृढ करण्याचा आमचा उद्देश आहे. अशा उपक्रमांची पुढेही सातत्याने आखणी केली जाईल.”