
सातारा प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा २६ ते ३० जूनदरम्यान सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतूक नियोजनात मोठे बदल केले आहेत. लाखो भाविकांचा सहभाग असलेल्या या धार्मिक सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यातील काही प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
पालखी सोहळा गुरुवार, २६ जून रोजी पुणे जिल्ह्यातून साताऱ्यातील पाडेगावमार्गे लोणंद (ता. खंडाळा) येथे प्रवेश करणार आहे. त्यानंतर तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम करून ३० जून रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होईल. पालखीचा मार्ग निरा-लोणंद-फलटण-पंढरपूर असा असणार आहे.
वाहतूक बंदीचे तपशील:
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २५ ते ३० जूनदरम्यान निरा-लोणंद-पंढरपूर मार्गावरील सर्वसामान्य वाहने बंदीच्या आदेशाखाली राहतील. केवळ पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक सेवांचीच वाहने पालखी मार्गावरून धावू शकतील.
प्रमुख पर्यायी मार्ग व्यवस्था:
२५ ते २९ जून: फलटणहून पुणे, निरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक वाठार स्टेशन किंवा बारामतीमार्गे शिरगाव घाटातून वळविण्यात येईल.
२५ ते २८ जून: आदर्की फाटा ते लोणंद मार्ग बंद.
२५ ते ३० जून: लोणंद ते फलटण वाहतूक आदर्कीमार्गे वळविण्यात येईल.
२८ ते ३० जून: फलटण ते नातेपुते वाहतूक पूर्ण बंद.
२८ जून: नातेपुतेहून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस-अकलूज-बारामतीमार्गे वळविली जाईल.
२८ जूनपासून: नातेपुते ते सातारा वाहतूक शिंगणापूर-तिकाटणे-दहीवडीमार्गे वळविण्यात येणार.
२९ जून: फलटणहून बरडकडे पालखी मार्गस्थ होईल. या दिवशी पालखीतील वाहनांना कोळकी-शिंगणापूरमार्गे पर्यायी मार्गाने वळवले जाणार आहे.
वाहनधारकांनी लक्ष द्यावे:
पालखी सोहळ्याच्या मार्गावरील गावांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्वसामान्य वाहनधारकांनी प्रशासनाने सूचित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
ही वाहतूक योजना केवळ भाविकांच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर गावातील नागरिकांचीही गैरसोय टाळण्यासाठी आखण्यात आली आहे. पालखी मार्गावरील जनतेने सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाचे आवाहन केले आहे.