
पुणे, प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नजीकच्या कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल रविवारी दुपारी अचानक कोसळल्याने हाहाकार माजला. या दुर्घटनेत पुलावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले. सुदैवाने एनडीआरएफच्या तातडीच्या बचाव मोहिमेमुळे ५१ पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये तिघे पुरुष व एका सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने कुंडमळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारी तीनच्या सुमारास काही पर्यटक पुलावर थांबले असताना अचानक पूल कोसळला आणि काहीजण थेट नदीत पडले. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी धावून आली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
जखमी झालेल्या पर्यटकांवर तळेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनडीआरएफने आज अधिकृतपणे बचावकार्य थांबवले असून प्रशासनाच्या आदेशानुसार हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आले आहे.
घटनास्थळी आज दुपारी ड्रोनच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण करण्यात येणार असून आणखी कोणी नदीच्या प्रवाहात अडकले नसल्याची खातरजमा केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, हा पूल जुना असून नियमित पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता सुरक्षा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असा संतप्त सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासनाकडून या दुर्घटनेची चौकशी सुरू असल्याचेही समजते.
या हृदयद्रावक घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटनस्थळी असलेल्या जुनाट आणि असुरक्षित बांधकामांची स्थिती, तसेच प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.