
धाराशिव प्रतिनिधी
ऑनलाईन जुगाराचा विषारी विळखा आणखी एका कुटुंबाच्या जीवावर उठला! धाराशिव तालुक्यातील बावी गावात लक्ष्मण जाधव (वय ३०) या तरुणाने ऑनलाईन रम्मी आणि शेअर बाजारातील नुकसानामुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीतून सुटका म्हणून पत्नी आणि चिमुकल्या मुलाची हत्या करून स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांचा संसार अगदी आनंदात सुरु होता. त्यांना शिवांश नावाचा दोन वर्षांचा चिमुकला मुलगा होता. पण या कुटुंबाच्या जीवनात अंधार पसरला तो लक्ष्मणच्या ऑनलाईन रम्मीच्या नादामुळे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मण जाधव रात्रंदिवस मोबाईलवर ऑनलाइन गेम्स खेळत असे. रम्मी आणि शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशांमुळे त्याच्यावर मोठं कर्ज झालं होतं. कर्जाची भरपाई करण्यासाठी त्याने आधी जमीन आणि नंतर राहते घरही विकले. मात्र तरीही कर्जाचा डोंगर कमी झाला नाही.शेवटी नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या लक्ष्मणने पत्नी तेजस्विनी आणि चिमुकल्या शिवांशचा गळा दाबून खून केला आणि स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना उघडकीस येताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंतिम कारण पोस्टमार्टेम अहवालानंतर स्पष्ट होईल. मात्र प्रथमिक चौकशीतून आर्थिक तणाव आणि ऑनलाईन जुगारच या कुटुंबाच्या उध्वस्त होण्यामागे कारणीभूत असल्याचे दिसत आहे.