
सोलापूर प्रतिनिधी
दहावी परीक्षेत एक अथवा दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलैमधील पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नुकतेच
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी परिपत्रक काढले आहे.
राज्यातील सुमारे नऊ हजार ५०० महाविद्यालयांतील विज्ञान, कला व वाणिज्य शाखांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया यंदा केंद्रीय पद्धतीने एकाच संकेतस्थळावर राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर इयत्ता दहावीमध्ये एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या केवळ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश देण्याची सवलत लागू केली आहे. त्यांचा हा प्रवेश तात्पुरता म्हणजे दहावीतील सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत राहणार आहे.
त्यांच्यासाठी अकरावीला अर्ज करण्याची सोय जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर म्हणजे विशेष फेरी एकनंतर केली जाणार आहे. इंग्रजी विषयात एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांनाही अकरावीसाठी तात्पुरता प्रवेश मिळणार आहे. मात्र, त्यांना भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास दहावीमध्ये विज्ञान विषयात ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. ही सवलत केवळ राज्य मंडळाच्या दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीही अशा प्रकारची सवलत असल्यास त्यांना त्याच मंडळाच्या अकरावी वर्गात प्रवेश मिळेल. त्यांना राज्य मंडळाच्या अकरावी वर्गात प्रवेश घेता येणार नसल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
साडेबारा लाख विद्यार्थ्यांनी भरले शुल्क
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पाच मेपर्यंत दहावी उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १२ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी १०० रुपये शुल्क भरून त्यांच्या प्रवेशाचा पहिला भाग पूर्ण केला आहे. तर राज्यभरातील महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता ही २१ लाखांहून अधिक आहे. यंदा १३ लाख ८७ हजार विद्यार्थी राज्य मंडळाची दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत