
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने मोठा पाऊल उचलले आहे. सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडेपाच महिन्यांत तब्बल ३० जणांना शहर व जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले आहे.
यासोबतच आणखी २५ गुन्हेगार तडीपारीच्या यादीवर ‘वेटिंग’मध्ये आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी पोलिसांची कारवाईला गती
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी शहरातील सात पोलिस ठाण्यांनी सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. विजापूर नाका, सदर बझार, सलगर वस्ती, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, एमआयडीसी आणि जेलरोड या ठाण्यांतून ही माहिती संकलित झाली आहे.
शरीराविषयक आणि मालाविषयक गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या, दोन किंवा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
तडीपारी प्रक्रिया कशी सुरू होते?
सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिस ठाण्याकडून प्रस्ताव पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त चौकशी करून अहवाल पोलिस उपायुक्तांकडे सादर करतात. त्यानुसार तडीपारीचा अंतिम निर्णय घेतला जातो.
धक्कादायक – तडीपार आदेश मोडल्याने कारागृहात रवानगी
भैरू वस्ती येथील दोन नंबर झोपडपट्टीतील आशितोष ऊर्फ धीरज अशोक जाधव (वय २५) याला पूर्वी तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने आदेश धाब्यावर बसवत सोलापुरात वावर सुरू ठेवला. त्यामुळे त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
सेटलमेंट कॉलनीतील दोन सख्ख्या भावांना तडीपार
सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. ३ येथील विनोद सिद्राम जाधव (३३) आणि विजय ऊर्फ सागर सिद्राम जाधव (२८) या दोघा भावांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. गुन्हेगारी टोळी जमवणे, घातक शस्त्राने हल्ला करणे, मारहाण व जीव घेण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्यांमुळे ही कठोर कारवाई करण्यात आली.
शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे पाऊल निश्चितच धाडसी आणि कठोर असून, येत्या काळात आणखी काही नावे तडीपार यादीत समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना स्पष्ट इशारा – “वर्तनात बदल करा, अन्यथा जिल्हाबंदी अटळ!”