पिंपरी प्रतिनिधी
थेरगाव येथील जगतापनगरमध्ये ११ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी एका रिक्षात २७ वर्षीय विधवा महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी वाकड पोलिसांनी कौशल्याने तपास करत आरोपीचा पुणे स्टेशन ते कर्नाटक आणि तेथून सोलापूरपर्यंत पाठलाग केला. अखेर एका क्षणासाठी मोबाइल ऑन झाल्याने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
सदर महिला ‘लिव्ह इन’ नात्यात राहत होती. तिचा मृतदेह घरासमोर रिक्षात आढळून आला होता. प्राथमिक तपासात ती महिला आणि एक रिक्षाचालक काळेवाडी परिसरात एकत्र राहत असल्याचे समोर आले. दोघेही दारूच्या आहारी गेले होते. मात्र, अलिकडे आरोपी रिक्षाचालक महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. अशाच एका वादातून त्याने तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह तिच्या आईवडिलांच्या घराजवळील रिक्षात ठेवून पसार झाला.
रिक्षाच्या क्रमांकावरून सुरुवात करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासात त्याचे पहिले लग्न झाले असून पत्नी सध्या मुंबईत राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचे आणि त्याच्या पत्नीचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली.
तपास पथक पुणे स्टेशन, कर्नाटक आणि तेथून सोलापूरपर्यंत गेले. अखेर सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात संशयिताच्या पहिल्या पत्नीने एक मिनिटासाठी फोन ऑन केला आणि त्याचे लोकेशन मिळाले. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता आरोपी एका दारूच्या दुकानात आढळून आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.
“संशयिताने पोलिसांना चकवा देण्यासाठी स्वतःचा मोबाइल सतत बंद ठेवला होता. मात्र, त्याच्या पहिल्या पत्नीने एका क्षणासाठी मोबाइल ऑन केल्याने आरोपीचा ठावठिकाणा लागला. पुणे स्टेशन ते कर्नाटक आणि पुन्हा सोलापूरपर्यंत केलेल्या या पाठलागात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला,” अशी माहिती वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.


