
जालना प्रतिनिधी
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर अशा प्रकारच्या अनेक घटना उजेडात येत आहेत. सासरकडून सतत होणाऱ्या छळाला, पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईवडीलांनी केला आहे.
वैष्णवींच्या मृत्यूनंतर हुंडाबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आपल्या लेकींचा हुंडामुळे छळ होऊ नये, हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाजाने लग्नासाठी एक आचारसंहिता तयार केली आहे. या आचारसंहितेनुसार नुकताच एक विवाह झाला.
फटाके, कर्णकर्कश डीजे, प्रि-वेडिंग शूटसारख्या गोष्टींना विरोध दर्शविण्यात आला आहे. विवाहातील खर्च मुलगा व मुलीच्या दोन्ही कुटुंबांनी समान पद्धतीने वाटून घ्यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत सामूहिक विवाहाला प्राधान्य देण्याचेही ठरवण्यात आले आहे. या सर्व नियमांचे पालन करुन करत जालना जिल्ह्यातील परतुर येथे पहिला साधा विवाह सोहळा नुकताच झाला.
या विवाह सोहळा मैलाचा दगड ठरला आहे, विवाह संस्थेत नवी परंपरा यानिमित्ताने सुरु झाली आहे. केवळ दोनशे पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. यातून सामाजिक सुधारणेचा एक मोठा संदेश गेला.परतुर येथील डॉ. नक्षत्रा बागल आणि परभणी येथील डॉ. जगदीश शिंदे यांनी यावेळी लगीनगाठ बांधली. नवरा-नवरी दोघेही डॉक्टर असल्याने त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बागल-शिंदे कुटुंबाने आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करीत हुंडा न देता आणि डीजे न लावता साधेपणाने विवाह केला आहे. केवळ 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, ज्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला. साखरपुडा कार्यक्रम होत असताना मराठा समाजाची बैठक झाली. यात साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय झाला. त्यांची अंमलबजावणी नक्षत्रा-जगदीश यांच्या विवाहात आली.
लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसापूर्वी सकल मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत हुंडा बंदीसाठी निर्णय घेण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमण्यात आली. मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार केली. लग्नात अनावश्यक खर्च टाळणं, हुंडा न देणं, हुंडा घेणाऱ्यावर बहिष्कार टाकणं आणि सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
: मराठा समाजाने तयार केलेल्या आचारसंहितेमधील प्रमुख मुद्दे
* विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून, मुलगा-मुलगी यांच्या नावे एफडी केली जाईल.
* काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात केली जाईल.
* वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि त्यावरील विभत्स नृत्य बंद केले जातील.
* प्रदूषण युक्त फटाके वाजवले जाणारं नाहीत. प्री-वेडिंग शूट टाळले जातील.
* विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत होईल.
* विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षाने अर्धा-अर्धा करावा.
* ज्या कुटुंबामधे महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो त्या कुटूंबाशी रोटी- बेटी व्यवहार समाज करणार नाही.
* हुंडा घेणाऱ्या कुटुंबाला मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल.
* ज्या महिलेचा सासरच्या माणसांकडून छळ होत असेल, त्या महिलेच्या माहेरची मंडळी मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.
* कोणत्याही प्रकारचे ओंगळवाणे प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केले जातील.
* मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणारं नाही. जावई मानासह सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील.
* मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल. विवाह सोहळ्यात एकच व्यक्ती आशीर्वादाचे भाषण देईल