
पुणे-भरधाव मोटार चालकाने एकापाठोपाठ पाच वाहनांना
धडक दिल्याची घटना बाणेर- सूस रस्त्यावर ननावरे
चौकाजवळ गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र, एका दुचाकीसह पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी मोटारचालकास ताब्यात घेतले आहे.
ऋत्विक श्याम बनसोडे (वय,१९) असे करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे, जो एका व्यक्तीकडे केअरटेकर म्हणून काम करतो. दरम्यान, ऋत्विक हा गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दूध आणण्यासाठी कारमधून जात असताना त्याने एका वाहनाला धडक दिली.
या अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसे करताना त्याने अन्य चार वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर संतापलेल्या जमावाने त्याला कारबाहेर येण्यास सांगितले. परंतु, त्याने नकार दिला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याच्या कारवर दगडफेक केली. या घटनेत कारची काच फुटली.
या घटनेची माहिती मिळतात बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचालकाला ताब्यात असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमा झाला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली.