
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळला या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं असून मुंबईची तुंबई झाल्याचं मुंबईकर म्हणत आहेत. या पावसामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला असून भुयारी मेट्रो स्थानकात पावसाचं पाणी साचल्याने प्रशासनाचे पितळ उघड पडले.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुंबई मेट्रो 3 अर्थात ॲक्वा लाईन सुरु केली होती. आरे ते वरळी असा मार्ग असणारी ॲक्वा लाईन भुयारी मार्गाने धावते. भुयारी मेट्रो मुंबईसारख्या शहरात कितपत व्यवहार्य ठरणार, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, राज्य सरकारने भुयारी मेट्रो पूर्णपणे सुरक्षित आहे, पावसात याठिकाणी काहीच होणार नाही, असा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात अवघ्या काही तासांत भुयारी मेट्रोच्या स्थानकांची भयाण अवस्था पाहायला मिळाली. त्यावरुन आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रो स्टेशनला भेट देत सरकारवर टीका केलीय. त्यास, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबईतील अॅक्वा लाईन भुयारी मेट्रो स्टेशनला शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत मुंबई मेट्रोच्या कामाची पोलखोल केली. येथील प्रशासन सांगतंय की मेट्रो स्टेशनचं काम सुरू आहे, जर काम सुरू आहे तर कोणत्या स्टेशनचं उद्घाटन केलं आणि का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. दादरच्या हिंदमाता परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून आदित्य ठाकरे यांनी येथील पाणी साचल्याचा व्हिडिओ देखील ट्विटरवरुन शेअर केल्याचं पाहायला मिळालं. आम्ही 4 वर्षांपूर्वीच हा परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता. मात्र, भाजपने मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवल्यानेच हे पाहायला मिळत आहे. कारण, महापालिकेनं कुठलीही पावसाळ्यापूर्व तयारी केली नाही. भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलं, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
एकनाथ शिंदेंचा पलटवार
आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ही पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले, आता पाणी राहिलेले नाही. 10 जूननंतर पाऊस येतो तशी तयारी आपण करत असतो. नरिमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला.नागरिकाना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री संपर्क ठेऊन आहेत, यंत्रणा अलर्ट आहे असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. दरम्यान, माहिम भागात म्हाडा इमारतीचा काही भाग कोसळला आहे, येथील लोकांना सुरक्षितरित्या दुसरीकडे पाठविण्यात आलं असून आधीच पाऊस पडल्यामुळे गैरसोय झाली आहे, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.