
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील ३ ते ४ तासांत शहरात ठिकठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पावसामुळे एक धक्कादायक घटना माहीममध्ये घडली आहे. पितांबर लेन परिसरातील ‘हाजी कासम’ या इमारतीचा काही भाग कोसळला असून, घटनास्थळी बचाव पथक व एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, मात्र घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
पनवेल स्टेशन परिसरात तिकीट काउंटरजवळ पाणी साचल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांना भिंती चढून स्टेशनपर्यंत जावे लागत आहे. अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व-पश्चिम, वर्सोवा, सात बंगले, चार बंगले, आंबोली, जुहू, जोगेश्वरी पश्चिम या परिसरात २ ते २.५ फूट पाणी साचले आहे. मोटर पंपच्या मदतीने पाणी काढण्याचे काम सुरू असून, वाहतूक पोलिसांनी काही भागांत वाहनांची हालचाल थांबवली आहे.
दरम्यान, शहरात व उपनगरात झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. बीएमसीच्या माहितीनुसार, शहरातील ४ ठिकाणी व पश्चिम उपनगरातील ५ ठिकाणी झाडे पडली आहेत. रेल्वे सेवा संथ गतीने सुरू असून, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे पाणी साचण्यावर लक्ष ठेवले जात आहे.
शक्कर पंचायत, सायन सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, जेजे मडावी पोस्ट ऑफिस, कुरणे चौक, बिंदुमाधव जंक्शन आणि माचरजी जोशी मार्ग (पाच गार्डन) या भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असून, नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.