
नाशिक प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील गंगापूर येथे विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती अपूर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराथी (40) यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराथी (37) हीने घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची मंडळी तिला त्रास देत होती, असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी केला आहे. भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.
दरम्यान मृत भक्ती अथर्व गुजराती यांना 5 वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी भक्तीचा फरार पती अथर्व गुजराती यास लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.भक्तीवर तिच्या माहेरी येवला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईक व येवलेकर नागरिकांनी निषेध व्यक्त करणारे तसेच भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेत झळकवत होते.