नाशिक प्रतिनिधी
पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर येथील पेलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केली होती. बिथरलेल्या पाकिस्तानने भारतीय सेमे पलीकडून गोळीबार सुरू केला आहे.
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तसेच या भागातील अन्य टूर ट्रॅव्हल्स कंपन्यांनी रद्द केल्या असून, ग्राहकांना त्यांचे पैसे परत केले जात आहेत.
नाशिकमधून दक्षिणेतील टूर मात्र सुरळीत आहेत; तर परदेशात तुर्की व अजहर-बैजानच्या टूर पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. भारत-पाक युद्धामुळे उत्तरेतील टूर रद्द करण्यात आल्याने जवळपास ८० कोटींचा फटका नाशिक जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसला आहे.
उन्हाळ्यात जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात पर्यटकांचा कल असतो. यंदाही पर्यटनाचा हंगाम तेजीत असताना पहलगाम पर्यटनस्थळावर अतिरेकी हल्ला झाला. यात ३६ हून अधिक भारतीय पर्यटक मारले गेले. त्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे ट्रीप रद्द करण्यासाठी तगादा लावला.
परंतु हिमाचल प्रदेश व उत्तराखंड तसेच या भागातील अन्य हिल स्टेशनकडे पर्यटकांना वळविता येत होते. परंतु भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर देशभरातील सोळा विमानतळे बंद करण्यात आली. त्यात उत्तर भारतातील अधिक विमानतळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंडीगड विमानतळ बंद करण्यात आल्याने पर्यटकांचे हाल झाले आहेत. जम्मू-काश्मीर, कुलू-मनाली, शिमला तेथील बुकिंग ट्रॅव्हल्स कंपन्यांनी रद्द केल्या आहेत. नाशिकहून दिल्ली विमानसेवा सुरू असल्याने नाशिकच्या प्रवाशांना उत्तर भारतातून नाशिकमध्ये येण्यासाठी दिल्ली विमानतळाचा पर्याय असल्याचे ‘तान’ने म्हटले आहे.
युरोपातील सर्व टूर्स सुरळीत
परदेशातील थायलंड, सिंगापूर येथे पोचण्यासाठी पर्यटकांना अडचण नाही. परंतु तुर्की व अजहर-बैजान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने या देशातील टूर ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, थायलंडमध्ये १००, व्हिएतनाम मध्ये नाशिकचे ७० पर्यटक आहे. त्या देशातील व्यवहार सुरळीत असल्याने पर्यटकांना त्रास नाही. युरोपातील सर्व टूर्स सुरळीत असल्याचे ‘तान’ने म्हटले आहे.
तात्पुरत्या स्वरूपात बंद विमानतळे
पंजाब व हिमाचल प्रदेश- चंडीगड, अमृतसर, लुधियाना, भुंतर, पतियाळा, शिमला, कांगडा-गगल, भटिंडा
जम्मू-काश्मीर व लडाख- श्रीनगर, जम्मू, लेह, पठाणकोट
राजस्थान- किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर
गुजरात- मुंद्रा, जामनगर, हिरासा (राजकोट), पोरबंदर, केशोद, कांडला, भूज
इतर- हलवारा
‘तान’ चे आवाहन
भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशातील काही विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सक्रिय टूरच्या ग्राहकांची माहिती त्वरित तपासून बंद असलेल्या विमानतळांजवळ असलेल्या ग्राहकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी.
आपल्या सर्व ग्राहकांशी तत्काळ संपर्क साधून सुरक्षिततेची खात्री करावी.


