
नाशिक प्रतिनिधी
पाण्याचा प्रेशर चेक करण्याच्या बहाण्याने व महिला एकटी असल्याचे पाहून तरुण भरदिवसा घरात घुसला. तरुणाने लष्करी जवानाच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून सुमारे चार लाखांचे दागिने लुटले. पळून जाण्यापूर्वी संशयित तरुणाने बाळाला ठार करण्याची धमकी देत महिलेचे अर्धनग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
ही घटना देवळाली कॅम्पमधील कारगील इनक्लेव्ह इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडली होती. संशयित तरुणाला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने राका कॉलनीत अटक केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात विनयभंगासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशील अनिल ठाकूर (२१, रा. हरिधाम अपार्टमेंट, संसारी गाव) असे संशयित तरुणाचे नाव आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता.२४) दुपारी दोनच्या सुमारास पीडित महिला व तिच्या बाळासोबत कारगील इनक्लेव्हमधील फ्लॅटमध्ये होती.
त्यावेळी संशयित सुशील ठाकूर आला.घरातील पाण्याचा प्रेशर चेक करायचा आहे, असा बहाणा करीत तो घरात शिरला. त्यानंतर त्याने पीडितेचे लक्ष विचलित करून बाळाला ताब्यात घेत त्याला ठार करण्याची धमकी देत दागिन्यांची मागणी केली. पीडितेला त्याने मारहाणही केली. भयभीत झालेल्या पीडितेने सुमारे ४ लाख ७ हजारांचे दागिने त्यास दिले. त्यानंतर संशयिताने पीडितेला अर्धनग्न करीत त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले.
सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो इमारतीतून खाली आला. त्यानंतर त्याने दुचाकीवरून धूम ठोकली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात जबरी चोरीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखा युनिट एकचे पथक करीत असताना अंमलदार प्रशांत मरकड व युनिट दोनचे अंमलदार गुलाब सोनार यांना संशयित राका कॉलनीत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, उत्तम पवार, रमेश कोळी, रोहिदास लिलके, विशाल देवरे, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, रमाधान पवार, युनिट दोनचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर मुक्तार पठाण, गुलाब सोनार, सुनील खैरनार यांनी राका कॉलनीतील स्वामिनी कॉस्मेटिकजवळ सापळा रचून संशयित सुशिलला अटक केली. त्याच्या अंगझडतीतून रोकड व मोबाईल असा एक लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.