पुणे प्रतिनिधी
पुणे शहरात अवजड वाहने आणि खासगी लक्झरी बस चालकांकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यात यावी, असा स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी दिला.
वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अपुरेपणा असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिक कडक पावले उचलण्याचे संकेत दिले. पुणे वाहतूक शाखेतील प्रशिक्षण सत्राच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
यावेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, तसेच उपायुक्त अमोल झेंडे, डॉ. राजकुमार शिंदे, अजय अग्रवाल, शशिकांत पाटील, अनिल पंतोजी आदी अधिकारी उपस्थित होते.
“शहरातील अपघातांची संख्या खुनाच्या घटनांपेक्षा अधिक आहे. डंपर आणि खासगी बसचालकांकडून वारंवार नियमभंग केला जातो. अशा प्रकरणांमध्ये केवळ दंड न करता त्यांच्या वाहनांवर थेट जप्तीची कारवाई करा,” असे निर्देश आयुक्तांनी दिले.
ते पुढे म्हणाले, “रस्ते अपघात ही अतिशय गंभीर समस्या आहे. नागरिकांचे प्राण जात आहेत. हे थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी.”
दरम्यान, २३ फेब्रुवारी ते १० मे दरम्यान वाहतूक विभागातील १८ सत्रांत विविध तज्ञांकडून प्रशिक्षण घेण्यात आले.
मान्सूनमध्ये पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरतील वाहतूक पोलीस, गेल्या वर्षी पावसाळ्यात पाणी साचणे, झाडे पडणे आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी याचा अनुभव लक्षात घेता यंदा वाहतूक पोलिसांना पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरावे लागेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या पथकासोबत संयुक्त ड्रील करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. “गरज पडल्यास रात्री-बेरात्री देखील रस्त्यावर उतरण्यास तयार राहा,” असा सज्जड इशाराही त्यांनी वाहतूक विभागाला दिला.


