
मुंबई प्रतिनिधी
गेल्या तिन चार दिवसाच्या तीव्र संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी शस्त्रविरामावर सहमती झाली. पाकिस्तानकडून शस्त्रविरामाचा प्रस्ताव आल्यावर संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही सहमती लागू करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
मात्र, यासोबतच भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत ताकीद दिली की, भविष्यात भारताविरुद्ध कोणत्याही कुरापती चालवू नयेत. विशेष म्हणजे, या शस्त्रविरामासाठी भारताने कोणत्याही अटी-शर्ती मान्य केलेल्या नाहीत.
दरम्यान, या शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याविषयी एक्स या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर मी सरकारच्या पाठीशी आहे
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘परकीय आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी मी नेहमीच भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांचा पाठिंबा दिला आहे आणि भविष्यातही देणार आहे. मात्र, देशहितासाठी माझ्या काही चिंता, शंका आणि सूचना आहेत, त्या मी मांडू इच्छितो.”
ट्रम्प यांनी ही घोषणा का केली?
‘शस्त्रविरामाची माहिती आपल्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून का मिळाली? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून ही माहिती का आली नाही? ट्रम्प यांचे वक्तव्य अशा प्रकारचे होते की जणू त्यांनी भारतावर उपकार केल्यासारखे दाखवले. परंतु परराष्ट्र मंत्रालयाच्या ब्रीफिंगनुसार या निर्णयामागे भारताचाच पुढाकार होता,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचा हेतू काय होता?
‘पाकिस्तान आक्रमक असताना आपण अमेरिकेच्या सांगण्यावरून शस्त्रविराम मान्य केला का? अमेरिकेने पाकिस्तानला वाचवण्यासाठी, त्याचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्यावर दबाव आणला का? पाकिस्तानने चीनसारख्या जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी करून अमेरिकेच्या मदतीवरील आपले अवलंबित्व कमी केले आहे. त्यामुळे अमेरिका पुन्हा पाकिस्तानच्या मनात घर करायचे होते का?’ असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
ऐतिहासिक संधी गमावली
‘पाकिस्तानकडे मर्यादित प्रमाणात दारूगोळा होता, जो जास्तीत जास्त 10 दिवस पुरला असता. त्यामुळे, पाकिस्तान आणि त्यांच्या पाठबळावर चालणाऱ्या दहशतवादाला कायमची समाप्ती देण्याची संधी आपल्या हातात होती. पण आपण ती संधी गमावली,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.