
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय सैन्यदलांनी पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. मंगळवारी मध्यरात्री, सुमारे पावणे दोन वाजता (1:45 AM), भारतीय जवानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले चढवत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले.
ही कारवाई २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली, ज्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
या अभियाना अंतर्गत, भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंधित एकूण नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यामध्ये बहावलपूर येथील मसूद अजहरच्या तळाचाही समावेश होता. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ आणि शस्त्रसाठे नष्ट करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता.
प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात ३० दहशतवादी ठार झाले असून ५५ हून अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले, तर काही अहवालांनुसार मृतांचा आकडा ५०० पेक्षा जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अन्य एका माहितीनुसार १२ दहशतवादी ठार तर ५५ जखमी झाल्याचे नमूद केले आहे. मुझफ्फराबादमधील बिलाल मशिदीजवळील लष्करच्या तळावर झालेल्या हल्ल्यात २३ दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.
जम्मूच्या अखनूर क्षेत्रात भारताने पाकिस्तानचे एक जेएफ-१७ लढाऊ विमान पाडल्याचेही वृत्त आहे. नियंत्रण रेषेवर तैनात असलेली चीनची एचक्यू-९ हवाई संरक्षण प्रणाली भारतीय क्षेपणास्त्रांना शोधण्यात अयशस्वी ठरल्याचेही समोर आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईची दृश्ये जम्मू-काश्मीर एका अज्ञात ठिकाणाहून आणि नियंत्रण रेषेवरून प्रसिद्ध करण्यात आली, जिथे भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात असे.
या हल्ल्यांनंतर तात्काळ भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना कारवाईची माहिती दिली. वॉशिंग्टनमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाने दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, कोणत्याही पाकिस्तानी नागरिक, आर्थिक किंवा लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले गेले नाही, केवळ दहशतवादी तळच लक्ष्य होते.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मध्यरात्री निवेदन जारी करून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली आणि सांगितले की ही कारवाई मोजकी, केंद्रित आणि कोणत्याही चिथावणीशिवाय केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते की, पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही. भारताने ‘एक्स’ (X) वर ‘न्याय झाला, जय हिंद’ असे नमूद केले.