
वसई प्रतिनिधी
लग्नाचं आमिष दाखवून चार वर्षं प्रेमसंबंध ठेवून त्यानंतर फसवणूक झाल्यामुळे एका तरुणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. रेवती उमेश निळे (वय २२) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून, या प्रकरणी तिचा प्रियकर आयुष राणा आणि त्याचे वडील अजय राणा यांना वसई पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष राणा हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. रेवती आणि त्याच्यात मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आयुषने लग्नाचं आमिष दाखवत वेळोवेळी रेवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप रेवतीने आत्महत्येपूर्वी आपल्या भावाशी बोलताना केला होता. विशेष म्हणजे, या संबंधांची माहिती आयुषच्या पालकांना देखील होती.
आयुषचे वडील अजय राणा हे पुजारी असून, त्यांनी रेवतीला काळा दोरा देत तिचं आणि आयुषचं लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी तिच्या बॅगेत धार्मिक विधीसाठी राखही ठेवली होती. प्रारंभी रेवतीला आयुषच्या आई-वडिलांकडून लग्नासाठी होकार मिळाला होता. मात्र, जेव्हा रेवतीने आयुषकडे लग्नाबाबत स्पष्ट विचारणा केली, तेव्हा त्याने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आणि संबंध तोडले.
यानंतर रेवतीने पुन्हा अजय राणा यांच्याशी संपर्क साधून लग्नाबाबत विचारणा केली असता, त्यांनी “कुंडली जुळत नाही” आणि “तू खालच्या जातीची आहेस” असे सांगत स्पष्ट नकार दिला. यामुळे मानसिक तणावात आलेल्या रेवतीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.
या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आयुष राणा आणि त्याचे वडील अजय राणा यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वसई पोलीस करत आहेत.