
मुंबई प्रतिनिधी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये धर्मादाय रुग्णालयाकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले होते. धर्मादाय रुग्णालयामध्ये कमी खर्चात, मोफत उपचार होतो याची माहिती देखील रुग्णांना नसते, रुग्णालयांकडून देखील ते सांगितले जात नाही. त्यामुळे गरजू लोकांची ऐनवेळी मोठी दर्शन होत असते.
रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालय धर्मादाय असल्याचे बॅनर लावले अनिवार्य असतानाही काही रुग्णालयांकडून त्याचे पालन होत नाही, या सगळ्याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
धर्मादाय रुग्णालयांवर वाॅच ठेवण्यासाठी तसेच रुग्णालयाची पथके तपासण्यासाठी पथक तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्यात येणार आहेत.
धर्मादाय रुग्णालयांनी 10% खाटा गरीब आणि 10% दुर्बल घटकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. अनामत रक्कम न घेता तातडीची सेवा देणे आवश्यक आहे. रुग्णालयांनी शिल्लक खाटा, उपचारांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरावी यासाठी सक्तीचे नियम लागू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात फलक व डॅशबोर्डद्वारे माहिती जाहीर करण्याची व्यवस्था करावी, जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून देखरेख ठेवावी आणि माहिती न भरलेल्या रुग्णालयांवर कारवाई करावी असेही र्निदेश दिले. 2023 पासून सुरू असलेल्या धर्मादाय मदत कक्षामार्फत आजवर 7 हजार 371 रुग्णांना 24.53 कोटींचा उपचार निधी वितरित करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे देण्यात आली.