
मुंबई प्रतिनिधी
लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफ लाईन मानली जाते. लोकल ट्रेन सोबतच मेट्रो सेवा, मोनो रेल आणि बेस्ट बस सुद्धा मुंबईकरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास फायदेशीर ठरत आहेत.
या वाहतुकीच्या मार्गांचा वापर करताना दरवेळी वेगवेगळे तिकीट काढावे लागते. त्यामुळे वेळ सुद्धा वाया जातो. हेच लक्षात घेता सरकारने आता एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता एकाच तिकिटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार आहेत.
मुंबईकरांना आता एकाच तिकिटावर लोकल ट्रेन, मेट्रो, बेस्ट बस, मोनोरेलने प्रवास करता येणार आहे. एका तिकिटावर प्रवासाची सुविधा 1 मे 2025 ते 15 मे 2025 दरम्यान मुंबईत सुरू होणार आहे. तसेच 15 जूनच्या आतमध्ये ही सुविधा एमएमआरमधील सर्व शहरांत सुरू केली जाणार आहे. मुंबईतील या सुविधेसाठीची ट्रायल सध्य सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शहरी वाहतुकीसाठी समर्पित असे सिंगल प्लॅटफॉर्म अॅपचा आढावा काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. या एकाच सिंगल अॅपवर मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस तसेच उपनगरीय रेल्वे (लोकल रेल्वे) जी मुंबई शहराची लाईफलाइन म्हणून ओळखली जाते, ती देखील यावर उपलब्ध असणार आहे. या एकच अॅपद्वारे प्रवासी आपली यात्रा व्यवस्थितपणे प्लानिंग करू शकणार आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांची वेळ वाचणार आहे आणि प्रवास जलद तसेच सुखकर होण्यास मदत होणार आहे. लवकरच ही सुविधा संपूर्ण एमएमआर परिसरात लागू केली जाणार आहे.
प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार
या अॅपद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे त्याच्या जवळ असणारे स्टेशन किंवा कोणती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्याच्या जवळ आहे, हे कळू शकेल. तसेच वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा मोठा वेळ यामुळे वाचणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली होती.